घोटाळ्यात अडकलेल्या डीसीसीत आता कर्मचाऱ्यांचेही पगार वाढीसाठी आंदोलन
By admin | Published: July 25, 2016 08:39 PM2016-07-25T20:39:40+5:302016-07-25T20:39:40+5:30
घोटाळा आणि एका संशयित आरोपीने केलेल्या आत्महत्येमुळे आधीच राज्यभर गाजत असलेल्या डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांनी आता आपल्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
ऑनलाइन लोकमत
बीड - घोटाळा आणि एका संशयित आरोपीने केलेल्या आत्महत्येमुळे आधीच राज्यभर गाजत असलेल्या डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांनी आता आपल्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारपासून सुरू केलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्व शाखांचे व्यवहार आज दिवसभर ठप्प राहिले. तीन दिवस हे आंदोलन चालणार असल्याने शेतकऱ्यांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. तीन दिवसात मागणी मान्य झाली नाही तर कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रताप माने यांनी दिली.
गेल्या तीन वर्षापासून डीसीसी बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांची वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता बँकेच्या संचालक मंडळाने दिलेला नसल्याने वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे. डीसीसी बँकेच्या जिल्ह्यात ५९ शाखा असून यापैकी ५७ शाखांमधून पीक विमा वाटप करण्याचे काम सध्या सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आता पीक वाटपाचे कामही ठप्प झाले आहे. दरम्यान बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सध्या ठेवीदारांचे पैसे देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने पगार वाढ करण्यात अडचणी येत असल्याचे सांगून संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे सांगितले. दिवसभर जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत कसलाही व्यवहार झालेला नसल्याने एका दिवसात तीस कोटीचा व्यवहार ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली