Devendra Fadnavis: साधू मारहाणप्रकरणी फडणवीसांचा थेट रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन; दिले महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:22 PM2022-09-14T22:22:44+5:302022-09-14T22:24:23+5:30

मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.

dcm and state home minister devendra fadnavis call from russia to maharashtra dgp about beating sadhus incident in sangli | Devendra Fadnavis: साधू मारहाणप्रकरणी फडणवीसांचा थेट रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन; दिले महत्त्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: साधू मारहाणप्रकरणी फडणवीसांचा थेट रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन; दिले महत्त्वाचे निर्देश

Next

Devendra Fadnavis: दोन वर्षांपूर्वी पालघर येथे हिंदू साधुंना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. अशीच एक घटना जत तालुक्यातील मोरबगी लवंगा या ठिकाणी घडली आहे. मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर आता या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया येत असून, नव्या शिंदे-भाजप सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट रशियातून पोलीस महासंचालकांना फोन करत महत्त्वाचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या रशिया दौऱ्यावर आहे. मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजप नेते विनय सहस्रबुद्धे हेदेखील रशियात गेले आहेत. मात्र, सांगलीत घडलेल्या घटनेची तत्काळ दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट रशियातून पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला. 

दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश 

सांगलीतील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना मारहाण करण्यात आली. मुले चोरण्याची टोळी असल्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रातही या घटनेचे मोठे पडसाद उमटले आहेत. या घटनेची माहिती मिळताच लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून या घटनेबाबतची संपूर्ण माहिती घेतली. तसेच या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. या साधूंनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत साधूंना जमावाच्या तावडीतून सोडवले. साधूंकडील आधारकार्ड आणि त्यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते कोणतीही मुले चोरणारी टोळी नसून, देवदर्शनासाठी पंढरपूरला जात असल्याचे समोर आले.

Web Title: dcm and state home minister devendra fadnavis call from russia to maharashtra dgp about beating sadhus incident in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.