Maharashtra Politics: “अली जनाब हे उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटतं का?” देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 02:55 PM2023-03-26T14:55:21+5:302023-03-26T14:55:54+5:30
Maharashtra News: याचे उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: खेड येथील सभेनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथे सभा होत आहे. खेडमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली होती. यानंतर आता मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठिकठिकाणी ऊर्दू भाषेत बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून भाजप नेते आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर टीका केली आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देत खोचक सवाल केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मालेगाव दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेला एक लाख जणांची उपस्थितीत असेल, असा मोठा दावा करण्यात आला आहे. तसेच या बॅनरचे संजय राऊत यांनी समर्थन केले असून, महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का? अनेक लेखक, अनेक अभ्यासक साहित्यिक त्यांनी उर्दूमध्ये लिखाण केलेल आहे. आणि त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त या सभेला यावे, यासाठी ठाकरे गटाकडून हे प्रयोजन केल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
अली जनाब हे उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटते का?
उर्दू भाषेत लागलेल्या या बॅनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटते का? हे त्यांना विचारा. उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेमध्ये कोणी काही म्हटले तर काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर ते लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचे उत्तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लावण्यात आलेल्या ऊर्दू भाषेतील बॅनरची जोरदार चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी ऊर्दू भाषेत लावण्यात आलेल्या बॅनरनी विशेष लक्ष वेधले असून, या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे, यासाठी विशेष प्रयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुस्लिम बहुल भागांमध्ये अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर लावले असून उर्दू भाषेतून या सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"