Maharashtra Karnataka Border Dispute: सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी केला अमित शाहांना फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 09:37 PM2022-12-07T21:37:33+5:302022-12-07T21:38:39+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी देवेंद्र फडणवीसांचे फोनवरुन काय बोलणे झाले?
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा सगळा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनीअमित शाहांना फोन केल्याचे सांगितले जात आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या घटनेप्रकरणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. बोम्मईंनी याबाबतीत कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांना फोन केल्याचे सांगितले.
अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी अमित शाहांकडे केली आहे. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सीमाप्रश्नावर अलीकडच्या काळात घडलेली संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. विनाकारण महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले योग्य नाही, हेही त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी माझा फोनवरून झालेला संवादही त्यांच्या कानावर घातला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे. तरीही गृहमंत्री अमित शाह यांनी यामध्ये लक्ष घालावे. त्यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. अमित शाह यात निश्चितपणे लक्ष घालतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"