“मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले, जनतेला त्रास होईल असे आंदोलन करु नये”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 06:37 PM2024-02-23T18:37:13+5:302024-02-23T18:38:33+5:30
DCM Devendra Fadnavis News: ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
DCM Devendra Fadnavis News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा काय असेल हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. यावरून आता राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही मनोज जरांगे यांना नोटीस बजावत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले होते. ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवत मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसी समाजात समाधान तर मराठा समाजात आनंद व्यक्त केला जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये
मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिले आहे. त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असे आंदोलन करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नसल्याने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे.
दरम्यान, या आंदोलनावरुन कायदेशीर लढाई सुरू झाली असून उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये, न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, भूमिका स्पष्ट करण्याचेही न्यायालयाने बजावले आहे.