Maharashtra Politics: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांशी चर्चा झाली का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:59 PM2023-01-25T13:59:35+5:302023-01-25T14:00:14+5:30
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेले होते.
Maharashtra Politics: राज्यपालांची राजीनामा देण्याची इच्छा, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिडवणूक यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेले. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याबाबत मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारांवर चर्चा झाली नाही. परंतु, आम्ही योग्यवेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला कायदेशीर अडचण नाही
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला कुठलीही कायदेशीर अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. कायदेशीर आणि घटनात्मक हे सरकार स्थापन करून कार्यरत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे हे मलादेखील वाटते. कारण इतकी खाती सांभाळयची त्यापेक्षा आपल्याकडे दोन सभागृह आहेत. तेव्हा एकाच वेळी सभागृहात एकच चर्चा होते. त्यावेळी ओढताण होते. त्यामुळे विस्तार आम्हाला करायचा आहे आणि तो आम्ही करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नाही. सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण २० मंत्री आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत. शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार मागील ४ महिन्यापासून रखडला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"