Maharashtra Politics: गिरीश महाजनांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 05:26 PM2022-09-27T17:26:41+5:302022-09-27T17:27:20+5:30
Maharashtra News: भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच सीबीआयने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भाष्य केले आहे.
महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात सीबीआयने पुन्हा नोंदवला आहे. मूळात जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे खंडणी आणि गुन्हेगारी धमकीचा जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता त्याची चौकशी सीबीआय करते आहे.
हे सगळे प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे
सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राइव्ह दिला होता. त्या पेन ड्राइव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा केला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आले होते. हे सगळे प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असेल या सर्व गोष्टींचा पेन ड्राइव्हच्या माध्यमातून खुलासा झाला होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.