राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 01:25 PM2024-03-20T13:25:08+5:302024-03-20T14:00:29+5:30
DCM Devendra Fadnavis News: बैठका सकारात्मक झाल्या असून, एक ते दोन दिवसांची वाट पाहावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
DCM Devendra Fadnavis News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी होत आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यातील १०२ जागांवर मतदान होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा, बैठकांचे सत्र सुरू आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला महत्त्वाची माहिती दिली.
एकीकडे महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. मतदारसंघातील उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटीवरून मनसे महायुतीत सहभागी होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले.
माढा, बारामतीची जागा आणि उमेदवारीचे ठरले का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माढा असेल किंवा बारामती असेल, सर्वांचे लक्ष्य एकच आहे. ते म्हणजे, महायुतीला मजबूत करणे आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे. त्यामुळे थोडे काही डिफरन्सेस असतील, तर ते दूर झाले पाहिजेत. मी एवढेच सांगेन की, ज्या माझ्या बैठका झाल्या आहेत, त्या अतिशय सकारात्मक झाल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अमित शाह आणि राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली?
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांच्याशी त्यांची भेट झाली आहे. या गोष्टी अतिशय प्राथमिक पातळीवर आहेत. यावर आता काही बोलण्यापेक्षा एक ते दोन दिवस वाट पाहावी. म्हणजे सगळ्या गोष्टी नीट आणि सविस्तर पद्धतीने सांगू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.