१९ बंगल्यांबाबत रश्मी ठाकरेंची चौकशी होऊ शकते का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 04:54 PM2023-06-29T16:54:43+5:302023-06-29T16:56:28+5:30
Devendra Fadnavis Vs Rashmi Uddhav Thackeray: जर ठाकरेंचे नाव आले तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis Vs Rashmi Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अलिबागमधील कोरलाई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अधिकृतपणे १९ बंगले बांधल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. काही महिन्यांपूर्वी याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १९ बंगल्याबाबत रश्मी ठाकरे यांची चौकशी होऊ शकते का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला होता.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, २०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण असेल, अजित पवार प्लॅन बी आहेत का? रश्मी ठाकरे यांची चौकशी होऊ शकते का? पहाटेच्या शपथविधीमध्ये शरद पवारांचा रोल काय होता, याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरे दिली. मी काहीही विसरत नाही, जर विसरलो असतो तर हे सरकार बनलेच नसते. मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा कागदपत्र घेऊनच उतरतो असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला.
१९ बंगल्यांबाबत रश्मी ठाकरेंची चौकशी होऊ शकते का?
रश्मी ठाकरेंच्या अलिबागच्या कथित १९ बंगल्यांबाबत गुन्हा दाखल आहे. चार्जशीटपर्यंत पोहोचले आहे. रश्मी ठाकरेंना चौकशीला बोलवायचे की नाही हे सरकार नाही पोलीस ठरवते. उद्धव ठाकरे त्यांच्या काळात पोलिसांत हस्तक्षेप करत होते, मात्र आम्ही करत नाही. मात्र कुठल्याही प्रकरणात कोणीही दोषी आढळले तर त्याला सोडणार नाही. जिथे कोणी दोषी आढळले, ज्यांचा समावेश किंवा इन्वॉल्मेंट असेल तर ठाकरे परिवारालाही सोडणार नाही. मात्र ओढून ताणून ठाकरे परिवाराला त्यात गुंतवायचे असेही करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, सूरज चव्हाण प्रकरणात भ्रष्टाचार झाला. कोरोना काळात बॉडी बॅगमध्ये घोटाळा झाला. ६०० रुपयांची बॉडी बॅग ६ हजार रुपयांची झाली. हा भ्रष्टाचार राण करणारा आहे. याची पाळमुळे जिथे पोहोचतील, त्यांच्यावर कारवाई करु. यामध्ये जर ठाकरेंचे नाव आले तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे सांगत, भ्रष्टाचाराविरोधात बीएमसीवर ठाकरे गटाचा मोर्चा हा म्हणजे सर्वात मोठा विनोद आहे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.