Maharashtra Politics: “राऊतांची तक्रार सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का, ते सहानुभूतीसाठी...”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:03 PM2023-02-21T22:03:57+5:302023-02-21T22:04:25+5:30
Maharashtra News: संजय राऊतांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांनी दोन हजार कोटींची डील झाली, हा न्याय नाही, असा मोठा आरोप केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुन्हेगाराला आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भातील तक्रार पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांच्या या तक्रारीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार आहे. सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सरकारवर चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत
कधी २ हजार कोटीचा आरोप करतात, तर कधी सुरक्षा व्यवस्थेतवरून ते सरकारवर चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत. मात्र ते चुकीचे असून त्यांना जर हे सहानुभूतीसाठी मिळवायचे असेल तर त्याकडे लोक चुकीच्या नजरेने बघत आहेत. सुरक्षा व्यवस्थेवरून राजकीय आरोप करणे चुकीचे आहे. तसेच त्यांना सुरक्षेची आवश्यकता असल्यास ती अवश्य पुरवली जाईल. महाराष्ट्रात यावरून कधीही राजकारण केले जात नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कोणत्याही नेत्याला सुरक्षा देण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करीत नाहीत तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमलेली असते. ती समिती त्या त्या नेत्याचे सर्वेक्षण करून सुरक्षेच्या संदर्भात निर्णय घेत असते. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"