Pune Bypoll Election 2023: “पैसे वाटणे भाजपची संस्कृती नाही, आम्ही निवडणूक जिंकू”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 08:36 PM2023-02-25T20:36:16+5:302023-02-25T20:36:51+5:30
Pune Bypoll Election 2023: जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
Pune Bypoll Election 2023: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार थांबला आहे. आता मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यातच काँग्रेसचे कसबा पेठ मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी यासाठी भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.
कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून पैशांचा वापर सुरु आहे, असा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर आंदोलन केलं. मात्र या आंदोलनात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र हे आरोप भाजपवर नाही आहे. तर हे आरोप मतदारांवर आहे की, मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदारांचा असा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही
आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू, मात्र पैसे वाटणार नाही. मतदारच आम्हाला वारंवार जिंकून देतात. कसबा आणि चिंचवडमध्ये आम्ही जिंकणार आहोत. हे माहीत पडल्यानंतर असा रडीचा डाव सुरू झालेला आहे. कसबामध्ये आचारसंहितेचा खुले उल्लंघन करण्यात आले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तसेच संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी कधीही विधान करत नाही. जे विधान मी करतो त्याचे माझ्याजवळ नेहमीच पुरावे असतात, आता ती वेळ नाही योग्यवेळी सगळ्या गोष्टी सांगेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"