Maharashtra Politics: लोक दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल? अडीच वर्षे नवीन काय घडवलं?; फडणवीसांचा राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:30 PM2022-12-16T20:30:30+5:302022-12-16T20:31:11+5:30
Maharashtra Politics: सीमावादाच्या मुद्द्यावरून राजकारण करता येत नाही, ही विरोधकांची खंत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: महाविकास आघाडीने महामोर्चासाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. यातच नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जे तिकडे गेले ते सगळे दलाल आहेत आणि ते आपल्या कामासाठी गेलेले आहेत, असे म्हटले आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास उरलेला नाही, म्हणून लोकं जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल?, कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल. मला असे वाटते की ही जी भाषा ते वापरतात, आता लोकांना या भाषेचा रागदेखील येतो आणि लोक त्यांना गांभीर्याने घेतही नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही, ही त्यांची खंत आहे
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे म्हणाले की, यामध्ये काही नवीन घडले नाही. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते होते ना अडीच वर्षे त्यांनी काय नवीन घडवलं? एका बैठकीत नवीन घडेल असे कधीच होत नाही. एक संवादाची सुरुवात झाली आहे. तणाव दूर करण्यासाठी ही बैठक झालेली आहे. त्यांना खरे म्हणजे या गोष्टीची चिंता आहे की, या विषयाला धरून ते जे काही राजकारण करू इच्छित होते, ते राजकारण आता त्यांना करता येणार नाही, ही त्यांची खंत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"