“दारुण पराभव होणार म्हणून EVMवर बोलणे सुरु”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 06:56 PM2024-03-03T18:56:07+5:302024-03-03T18:56:19+5:30
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray: हे जिंकले तर ईव्हीएम चांगले, पण पराभव झाला तर मात्र ते वाईट, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपानेही १९५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा यामध्ये समावेश नाही. यावरून आता भाजपावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पहिल्या यादीवर भाष्य करताना ईव्हीएमवरूनही टीका केली आहे. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
उद्योगपती, शेतकरी, कामगारांच्यात असंतोष आहे. पण, ईव्हीएमने हे जिंकू शकतात. जर दुर्दैवाने हे ईव्हीएमने हे जिंकले तर देशात मोठा असंतोष पसरेल, मला याची चिंता वाटते. आपण जनतेसोबत आहोत. सुरुवातीच्या काळापासून नितीन गडकरी यांचे नाव ऐकले आहे. भाजपाचे ते निष्ठावन कार्यकर्ते आहेत. त्यांनी रस्त्यांचे मोठे काम केले, अशा व्यक्तींचे पहिल्या यादीत नाव नाही. पण घोटाळा करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचे नाव आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
दारुण पराभव होणार म्हणून EVMवर बोलणे सुरु
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असे वाटते की, उत्तर देण्यालायकही हा मुद्दा राहिलेला नाही. हे जिंकले तर EVM चांगले, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असे यांचे धोरण आहे. आता त्यांना माहिती आहे की त्यांचा येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल बोलणे सुरू केले आहे. या ठिकाणी या सर्वांना एकच सवाल आहे. देशाच्या इलेक्शन कमिशनला ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा? आत्तापर्यंत एकही राजकीय पक्ष असे काही करू शकलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, आता गेल्या दहा वर्षात अनेक जुन्या योजनांची नावे बदलली आहेत तसेच आता जुमलाचे नाव गॅरेंटी झाले आहे. आपण सर्व जनतेला भेटत आहोत. सर्व स्तरातील जनता नाराज आहे. यात आपण अंधभक्तांना धरत नाही. त्यांना डोळे असून दृष्टी नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.