Maharashtra Politics: “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, पुन्हा आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 03:47 PM2022-12-17T15:47:49+5:302022-12-17T15:48:40+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरेंची कॅसेट १० वर्ष तिथेच अडकली आहे. लोकांना ऐकावसे वाटेल असे भाषण त्यांनी करावे, हीच माफक अपेक्षा आहे, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न, महागाईल, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. या मोर्चाला संबोधित करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. या नेत्यांच्या टीकेचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केले आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. सरकार टिकणार नाही, या दाव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. हे सरकार टिकणार. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आणि त्यांच्याच नेतृत्वात पुढील निवडणुका लढणार. इतकेच नव्हे तर आमचेच सरकार येणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हे सरकार आल्यावरचा नाही, ६० वर्ष जुना
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा हे सरकार आल्यावर सुरू झालेला नाही. गेली ६० वर्ष हा वाद आहे. तसेच वारंवार या लोकांनी राज्यात सरकार चालवले. मात्र, यावर काहीही केलेले नाही, ही गोष्ट हे तीन पक्ष विसरत आहेत, असे सांगत आता कोणत्या तोंडाने सांगत आहेत, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे हा मोर्चा राजकीयदृष्ट्या काढण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कालही आमचे श्रद्धास्थान होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंचा पक्ष नॅनो होतोय, त्यांची कॅसेट तिथेच अडकलीय
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे कारस्थान असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर बोलताना, उद्धव ठाकरे यांची कॅसेट गेली १० वर्ष तिथेच अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही, हे त्यांनाही माहिती आहे. या भारताचे संविधान सर्वोच्च आहे. किती दिवस उद्धव ठाकरे तेच तेच डायलॉग मारणार आहेत. त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाही. केवळ शिवराळ भाषा वापरण्यापुरते त्यांनी भाषण केलेले आहे. उद्धव ठाकरेंनी काही नवीन लोक नेमले पाहिजेत, जे दोन-चार नवीन मुद्दे त्यांना लिहून देतील. त्यामुळे एका मोठ्याने नेत्याने काहीतरी भाषण केले आहे, भाषण ऐकावेसे वाटेल, असे उद्धवजी बोलतील, एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे, असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसा हा मोर्चा नॅनो मोर्चा होता, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, महाविकास आघाडीचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, देव-देवतांना शिव्या देतात, वारकरी संप्रदायाला शिव्या देतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहिती नाही, तो कधी झाला हे माहिती नाही, ती मंडळी कोणत्या तोंडाने मोर्चा काढतायत, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. जाणीवपूर्वक राजकीय मुद्दा बनवला जातोय. दररोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. स्वातंत्र्यवीर सारवकर मोठे नाहीत का, त्यावेळी मोर्चा का नाही काढला, असा रोखठोक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"