Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत, पण...”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:06 PM2023-02-23T18:06:35+5:302023-02-23T18:07:10+5:30
Maharashtra News: आम्ही वैचारिक विरोधक जरुर पण एकमेकांचे शत्रू नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कटुता नाही, माझे मन साफ आहे. आमच्या घरात असेच वातावरण आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही, असे मत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकमतच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात विधान केले आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत, असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धवजींनी वेगळा विचार सोबत घेतला आहे. माझ्या पक्षाचा विचार वेगळा आहे. आम्ही वैचारिक विरोधक आहोत. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीनुसार आपण वैचारिक विरोधक असतो. मी अनेकदा मुलाखतीतही सांगितले आहे, उद्धवजी काय किंवा आदित्य ठाकरे काय माझे शत्रू नाहीत. वैचारिक विरोधक झालो कारण त्यांनी दुसरा विचार स्वीकारला. माझा विचार वेगळा आहे. आम्ही वैचारिक विरोधक जरुर पण एकमेकांचे शत्रू नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.
सध्या तुम्हाला अर्धेच समजलेय, सर्व गोष्टी बाहेर काढणार
पहाटेच्या शपथविधीसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हळूहळू सगळे गौप्यस्फोट होत आहेत. मी जे बोललो तेच कसे खरे होते, हे तुम्हाला हळूहळू समजत आहे. मात्र सध्या तुम्हाला अर्धेच समजलेले आहे. अर्धे समजायला अद्याप वेळ आहे. मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही देवेंद्र फडणवीस यानी खोचक शब्दांत समाचार घेतला. संजय राऊत यांना माझी क्षमता इतकी वाटते आहे, त्यांना इतका विश्वास वाटतो याबद्दल आभार मानतो. पण तुम्हाला एक सांगतो की, अलीकडच्या काळात संजय राऊत जे बोलत आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दुर्दैवाने ते एका पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या लेव्हलच्या नेत्याने बोलताना थोडा विचार केला पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"