“राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली? आदित्य ठाकरे अन् सुप्रिया सुळे...”; फडणवीस थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 09:13 AM2024-03-18T09:13:45+5:302024-03-18T09:14:09+5:30

Devendra Fadnavis News: मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहिती आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

dcm devendra fadnavis slams congress thackeray group and ncp sharad pawar group | “राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली? आदित्य ठाकरे अन् सुप्रिया सुळे...”; फडणवीस थेट बोलले

“राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली? आदित्य ठाकरे अन् सुप्रिया सुळे...”; फडणवीस थेट बोलले

Devendra Fadnavis News: आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करणे आणि जागावाटप यावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने भाजपाला पराभूत करण्याचा निर्धार केला असून, भाजपानेही कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ऐतिहासिक फुटीचा लोकसभा निवडणुकांमध्ये कसा परिणाम होऊ शकतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय घडामोडींवर थेट शब्दांत भाष्य केले. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा पायंडा पाडला. मात्र भाजपा हा एकमेव पक्ष होता, ज्याने स्वतंत्र शैली विकसित केली. आता अन्य राजकीय पक्ष हळूहळू स्वतःमध्ये बदल करत आहेत. भाजपाच्या पावलांवर पाऊल टाकत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली?

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट का पडली? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढे आणले आणि नंतर वरिष्ठांना वाटले की पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. हेच शिवसेनेतही झाले. उद्धव ठाकरेंना वाटले की, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना पुढे आणले पाहिजे. त्याच अनुषंगाने राजकारणात वाटाघाटी सुरू केल्या. यासाठी आपली मूळ विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेला स्वीकारले. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दरम्यान, भाजपाने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. जर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचं असेल तर त्यांनी जरूर यावे. पण स्वतःच्या ताकदीवर यावे. राजकारण स्वतःचा हक्क समजून येऊ नये. जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून जेव्हा फक्त आपल्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत केले जाते, त्याला घराणेशाहीचे राजकारण म्हणतात. मल्लिकार्जुन खरगे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

Web Title: dcm devendra fadnavis slams congress thackeray group and ncp sharad pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.