देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् बच्चू कडू निघाले गुवाहाटीला; बंडामागे काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:33 PM2023-08-22T18:33:34+5:302023-08-22T18:33:59+5:30
सगळेजण मंत्रिपदे मागत होती. पण आम्हाला मंत्रालयच भेटले मग मंत्रिपदाचे काय आहे असं विधान बच्चू कडू यांनी केले.
पुणे – दिव्यांगांच्या आंदोलनापासून दिव्यांग मंत्रालयापर्यंत प्रवास गेला आहे. मला एकनाथ शिंदे यांचं खासकरून आभार आणि कौतुक करायचे आहेत. मी अडीच वर्ष राज्यमंत्री होतो. मी दिव्यांग मंत्रालय करा यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु ते झाले नाही. त्यात ते सरकार पडले. आणि मलाही गुवाहाटीला बोलावणे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला त्यानंतर मी गुवाहाटीच्या वाटेला लागलो असा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, मला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला तेव्हा सगळ्यात आधी त्यांना सांगितले. पहिले दिव्यांग मंत्रालय करा त्यानंतर मी येतो नाहीतर येत नाही आणि आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर बदनाम झालो. एवढे बदनाम झालो की सगळीकडे ५० खोके, ५० खोके सुरु होते. मला बदनामीची काही चिंता नाही. आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात निर्माण केले. आम्ही बदनाम झालो पण तुमच्यासाठी मजबुतीने उभे आहोत असं त्यांनी सांगितले.
तसेच बदनामीचं काय करायचे? पण या बदनामीतून जर एखाद्या दिव्यांगाला त्याला त्याचे घर मिळत असेल तर त्याहून जास्त आनंद काय असेल. सगळेजण मंत्रिपदे मागत होती. पण आम्हाला मंत्रालयच भेटले मग मंत्रिपदाचे काय आहे. यापेक्षा मोठे काय आहे. मुख्यमंत्री होऊन जास्त आनंद झाला नसता तेवढा दिव्यांग मंत्रालय झाल्याने झाला. सध्या दिव्यांग मंत्रालयाला मंत्री नाही, आयुक्त नाही, कर्मचारी नाही. दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त लवकर नेमू असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.
कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारला सुनावले
केंद्र सरकार नामर्दासारखे वागते, फक्त सत्ता टिकावी म्हणून ग्राहकांचा विचार केला मग पिकवणाऱ्यांचा विचार सरकार का करत नाही. ही नालायक प्रवृत्ती आहे. मी जरी एनडीएमध्ये, सत्तेत असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने हे विधान मला करावेच लागेल. भाव वाढले तर हस्तक्षेप करता मग भाव कमी झाल्यावर सरकार हस्तक्षेप का करत नाही असा सवाल बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला विचारला.