तब्बल २६ तासांनी सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 01:06 AM2017-03-03T01:06:16+5:302017-03-03T01:06:16+5:30
भीमा नदीपात्रात जलपर्णीच्या विळख्यात अडकून बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल २६ तासांनंतर सापडला.
शिरसगाव काटा : येथील भीमा नदीपात्रात जलपर्णीच्या विळख्यात अडकून बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल २६ तासांनंतर सापडला. वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील शेतकरी नंदकुमार मल्हारी शेलार (वय ४०) हे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीमा नदीपात्रातील मोटर असलेल्या पाईपला अडकलेला कचरा काढण्यासाठी पाण्यात उतरले होते. या वेळी त्यांनी पाण्यात उडी मारली; परंतु जलपर्णीत अडकल्याने पाण्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. रात्री मृतदेह न सापडल्याने सकाळी
९ पासून पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली.
भीमा नदीच्या सर्वच पात्राला जलपर्णीने मोठ्या प्रमाणावर विळखा घातला आहे. ज्या ठिकाणी तरुण बुडाला होता, त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दोन होड्यांच्या साह्याने पाण्यात उतरून शोध घ्यायचा प्रयत्न केला. या ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणावर असल्याने ती हटविणे गरजेचे असल्याने स्थानिक भिल्ल समाजाचे तरुण व मांडवगण फराटा येथील युवकांनी एकत्र येऊन जलपर्णी थोडी-थोडी हटविण्याचा निर्णय घेतला. पाण्याची दुर्गंधी, अतिशय खराब पाणी व जलपर्णी ही शोधमोहिमेत अडथळा ठरत होती. विविध जाळ्यांच्या साह्याने जलपर्णी हटवली. अरुण खोमणे या युवकाने पाण्यात बुडी मारली असता त्याला मृतदेह दिसून आला.
पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण ग्रुपचे आबासाहेब जगदाळे, विक्रम जमादार, अंकुश आंबेकर आदींनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसीलदार राजेंद्र पोळ हे उपस्थित होते.
>१३ तास अथकपणे शोध
भीमा नदीतील जलपर्णी धोकादायक असूनही तरुणांनी जिवाची पर्वा न करता दोन दिवसांत सुमारे १३ तास पाण्यात शोध घेण्याचा अटोकाट प्रयत्न केला. याकामी अग्निशामक दलाच्या जवानांनीदेखील मदत केली व अखेर स्थानिक युवकांच्याच प्रयत्नांना यश आले अन् मृतदेह हाती लागला.