बेवारस मृतदेह रुद्रगौडाचा?
By admin | Published: October 29, 2015 01:11 AM2015-10-29T01:11:27+5:302015-10-29T01:11:39+5:30
ष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला
बेळगाव : जेष्ठ कन्नड साहित्यीक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला. हा मृतदेह संशयित मारेकरी सनातनचा बेपत्ता साधक रुद्रगौडा पाटील याचाच असल्याचे वृत्त सोशल मिडियावर फिरु लागले.काही वाहिन्यांनीही ते देण्यास सुरवात केल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली. दिवसभर चर्चेचा विषय झाला . पण पोलिसांनी किंवा इतर तपास यंत्रणांनी हा मृतदेह रुद्रगौडाचा असल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.उत्तर विभागाचे पोलीस महासंचालक उमेशकुमार यांनी देखील मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे सांगितले.
१८ आॅक्टोबर रोजी खानापूर जवळील माणिकवाडी येथील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर विच्छेदन करून तो मृतदेह बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. ओळख न पटल्यामुळे त्या मृतदेहाचे मंगळवारी पोलिसांनी दफन केले. जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे छायाचित्र खानापूर येथील एका व्यक्तीने मोबाईलवर काढले होते . तो मृतदेह आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जाहीर केलेले मारेकऱ्याचे रेखाचित्र यात साम्य असल्याचे छायाचित्र काढलेल्या व्यक्तीच्या ध्यानात आले. नंतर त्याने मृतदेहाचे छायाचित्र आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्याचे पोलिसांनी जाहीर केलेले रेखाचित्र सोशल मिडीयावर पोस्ट केले. त्यानंतर काही वाहिन्यांनी कलबुर्गींच्या मारेकऱ्याच्या चेहऱ्याशी अज्ञात मृतदेहाचे साम्य असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरु केल्यावर सापडलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बेपत्ता असलेल्या रुद्रगौडा पाटीलचा असावा अशी चर्चा रंगू लागली. (प्रतिनिधी)
वयातील फरक
अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे वय २५ ते ३० दरम्यान असण्याची शक्यता असून, रुद्रगौडाचे वय सध्या ४० किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मृतदेह रुद्रगौडाचा असण्याची शक्यता कमी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
मृतदेह पुन्हा बाहेर काढणार
कर्नाटक सीआयडीचे एक पथक आज गुरुवारी जिल्ह्यात दाखल होत आहे. या पथकाकडून खानापूर पोलिसांनी दफन केलेला तो मृतदेह पुन्हा बाहेर काढून, त्याचा पुन्हा पंचनामा केला जाण्याची शक्यता आहे.