स्थानके हस्तांतरास मार्चची डेडलाइन
By Admin | Published: December 4, 2014 02:51 AM2014-12-04T02:51:07+5:302014-12-04T02:51:07+5:30
सायबर सिटीतील सिडकोच्या ताब्यातील सर्व रेल्वे स्थानके देखभालीसाठी रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे
नवी मुंबई : सायबर सिटीतील सिडकोच्या ताब्यातील सर्व रेल्वे स्थानके देखभालीसाठी रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हस्तांरणाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्या टप्प्यात हार्बर मार्गावरील एक स्थानक हस्तांतरित करण्याची योजना आहे. तशा आशयाचा प्रस्ताव रेल्वेकडून सिडकोला प्राप्त झाला आहे. पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व स्थानकांचे हस्तांतर केले जाणार आहे. त्यासाठी आगामी वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंतची डेडलाइन निश्चित करण्यात आल्याचे समजते.
नवी मुंबईतील वाशी-पनवेल मार्गावर दहा तर वाशी-ठाणे ट्रान्स मार्गावर पाच अशी एकूण पंधरा रेल्वे स्थानके आहेत. ही सर्व स्थानके रेल्वे आणि सिडकोने संयुक्तरीत्या उभारली आहेत. या स्थानकांच्या उभारणीसाठी आलेल्या एकूण खर्चात सिडकोचा वाटा ६७ टक्के आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ही स्थानके सिडकोच्या ताब्यात आहेत. असे असले तरी या स्थानकांची म्हणावी तशी डागडुजी होत नाही. ही स्थानके रेल्वेकडे हस्तांतरित करावीत, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व स्थानकांचे मार्च २0१५ पूर्वी रेल्वेकडे हस्तांतरण केले जाईल.