घातक टीन एजर

By Admin | Published: May 30, 2016 01:16 AM2016-05-30T01:16:03+5:302016-05-30T01:16:03+5:30

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम जसा कुटुंबपद्धतीवर होत आहे तसाच तो लहान मुलांच्या जडणघडणीवरही होऊ लागला आहे.

Deadly Teen Egars | घातक टीन एजर

घातक टीन एजर

googlenewsNext


पुणे : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम जसा कुटुंबपद्धतीवर होत आहे तसाच तो लहान मुलांच्या जडणघडणीवरही होऊ लागला आहे. ज्या वयात मुलांच्या हातामध्ये पुस्तके पडायला हवीत, सुसंस्कार व्हायला हवेत त्या वयात ही कोवळी पावले गुन्हेगारीकडे वळत आहेत. खून, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे अल्पवयात दाखल झालेल्या उद्याच्या पिढीचे भवितव्य चिंताजनक बनू पाहत आहे. गुन्हेगारी आणि पैशांचे आकर्षण ही या लहान मुलांपुढील आव्हाने आहेत. पालकांपुढे बालगुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पोलिसांकडील आकडेवारीनुसार साधारणपणे १४ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषत: १६ ते १८ वयोगटातील मुलांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमधला सहभाग चिंताजनक आहे. पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आपली मुले काय करतात, कुठे जातात, याचा पत्ताच पालकांना नसतो. मुलांच्या शाळांच्या दप्तरांमध्ये चाकू आणि कोयत्यासारखी हत्यारे असतात, याचीही माहिती त्यांना नसते. आजूबाजूला वाढत
चाललेली गुन्हेगारी, गुन्हेगारांचे
वलय हे मोठे आकर्षण या वयोगटातील मुलांना आहे. गणेशोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव स्पिकरच्या भिंती उभारून त्यासमोर बीभत्स नाच करणाऱ्यांमध्येही याच वयातील मुलांचा सर्वाधिक सहभाग असतो. पैसा आणि दहशतीचे आकर्षणही या मुलांसमोरची आव्हाने आहेत. कमी वयात मिळणारा पैसा आणि त्यातून करता येणारी मौजमजा त्यांच्यामधील गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालत आहे.
अल्पवयातील मुलांच्या आसपासचे वातावरण, त्यांची भावनिक आणि शारीरिक वाढ, त्यांची संगतसोबत आणि त्यांच्याशी साधला जाणारा संवाद याचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. अल्पवयातल्या गुन्हेगारांना शिक्षा आणि त्यांचे समुपदेशन अशा दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत त्यांना जाणीव करून देण्यासोबत बालगुन्हेगारीचे समाजावर होणारे दूरगामी परिणामही लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने बालगुन्हेगारांचे वय १६ पर्यंत खाली आणल्यामुळे या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. मात्र, कायद्यापेक्षा बालगुन्हेगारी रोखणे ही समाजाचीही तेव्हढीच जबाबदारी आहे.
अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये सुधारणा होण्यासाठी सुधारगृहे चालवली जातात. त्यांचा दर्जा आणि तेथील वागणूक यामुळे या मुलांवर नेमका उलटा परिणाम होतो. मुले सुधारण्याऐवजी बिघडत जातात. त्यांच्यातील गुन्हेगारीवृत्ती बळावत जाते, ही वस्तुस्थिती आहे. तिथे गेल्यावर राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या अन्य आरोपींसोबत त्यांची ओळख होते. त्यातून त्यांची टोळी तयार होते.
पुढे हीच मुले सुधारण्याऐवजी चोऱ्या, घरफोड्या, दरोड्यांसारखे गुन्हे करण्यात सराईत होतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने बाल गुन्हेगारांचे वय १६ पर्यंत कमी केल्यामुळे त्याचा पोलीस यंत्रणेला आणि न्यायसंस्थेला फायदा होणार आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाल्यास त्यापासून इतर धडा घेतील. कायद्याचा धाकच त्यांना रोखू शकतो.
>महागडे कपडे आणि वेगवान दुचाकींची ‘क्रेझ’ त्यांच्यामध्ये आहेच. त्यामुळेच रात्री-बेरात्री दुचाकीचालकांना अडवून त्यांना
लुटण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात
घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे.
>बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमधील अल्पवयीन आरोपींचे प्रमाण लक्षणीय आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही अल्पवयीन आरोपींचेच प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
>गुन्हेगारीकडे वळणारी ही पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि समाजासमोर आहे. केवळ दंडुकेशाहीने हा प्रश्न सुटणारा नाही. अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनाच मुलांसोबतचा संवाद वाढवावा लागणार आहे.
>शालेयस्तरावरही मुलांना त्याचे धोके समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि समाजाला वेठीस धरणारा गुन्हेगार तयार होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Deadly Teen Egars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.