जीर्ण वीजवाहिन्या ठरताहेत जीवघेण्या
By admin | Published: July 14, 2017 03:07 AM2017-07-14T03:07:34+5:302017-07-14T03:07:34+5:30
पनवेल महापालिका हद्दीतील व तालुक्यातील विजेच्या तारा नागरिकांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील व तालुक्यातील विजेच्या तारा नागरिकांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत तळोजा परिसरातील किरवली व पेंधर भागातील विजेच्या तारा तुटल्याने दोघांचा जीव गेला आहे. नागरिकांनी भिंगारी येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
पनवेलच्या ग्रामीण भागातील महावितरणचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक भागातील सडलेले विजेचे खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत, तर काही खांब वाकलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे याठिकाणी आणखी मोठी जीवितहानी होऊ शकते. खंडित वीजपुरवठा, गंजलेले विजेचे खांब, जुनाट वीजवाहक तारा अशा अनेक समस्यांना ग्रामीण भागातील महावितरणच्या ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण भागातील वीज यंत्रणा जुनाट झाली आहे. काही ठिकाणच्या विजेच्या खांबांना वेलींनी आलिंगन घातले आहे, तर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसत आहेत. विजेच्या तारा तुटणे, खांब पडणे यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा नेहमीच खंडित होतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणचा भोंगळ कारभार पाहावयास मिळत आहे. बहुतांश डीपींना झाकणे नाहीत तर काही डीपी दिवस-रात्र उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो.
विजेच्या खांबांमध्ये असलेले जास्त अंतर यामुळे काही ठिकाणी तारा लोंबकळल्या आहेत. जीर्ण खांब व तारा कधीही पडून मोठा अपघात होऊ शकतो. मात्र महावितरण या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नसल्याने गेल्या १५ दिवसांत तारा पडल्याने दोघांचा नाहक जीव गेला आहे. आणखी किती नागरिकांचा जीव गेल्यावर महावितरण जागे होईल, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी देखील सुरूच आहे. मीटरमध्ये फेरफारकडून वीज चोरी करण्यात येत आहे. सडलेले खांब, लोंबकळलेल्या विजेच्या तारांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीर्ण विद्युत तारा व विजेचे खांब तत्काळ बदलावेत अशी येथील जनतेची मागणी आहे. पावसाळ्यात विजेच्या तारा पडल्यामुळे जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या असताना देखील महावितरण कधी जागे होणार, असा सवाल स्थानिक विचारत आहेत. याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.