मृत जलस्रोतांना नवसंजीवनी!
By admin | Published: May 24, 2015 01:39 AM2015-05-24T01:39:48+5:302015-05-24T01:39:48+5:30
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या.
राजेश भोजेकर ल्ल वर्धा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात आल्या आणि अद्याप राबविल्या जातही आहेत. यातील काहींना यश आले तर काही गुंडाळाव्या लागल्या. यातील मृत जलस्रोत जिवंत करून भूगर्भातील जलसाठा वाढविण्यावर भर देणारी योजना उपयुक्त ठरली आहे. तामसवाडा येथील शेतकऱ्यांनी ही योजना राबवून परिसर जलयुक्त केला. ‘उगम ते संगम’ या तत्त्वावर शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या केलेला हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला मार्गदर्शक ठरला आहे.
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. यामुळे लाखो लिटर पाणी नदी व नाल्याद्वारे वाहून जाते. परिणामी, पावसाळा संपला की शेतपिकांसाठी तर दूरच पिण्याकरिताही पाणी मिळत नाही. हे ध्यानी घेऊन तामसवाडा येथे नाल्याचा उगम ते नदीला मिळेपर्यंतच्या पात्राचे सर्वेक्षण करण्यात आले. या नाल्याच्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न तेथील शेतकऱ्यांनी केला. या प्रयोगाला १०० टक्के यशही मिळाले.
तामसवाडा नाला गाळविरहित करण्यात आला. शिवाय रुंदीकरण, विविध प्रकारचे माती बांध, दगडी, गॅबियन, सिमेंट बांध आदी कामे जलसंधारणासाठी मिळणारा विशेष निधी व स्थानिक विकास योजनेतून करण्यात आली. यामुळे आठ किमी लांबीच्या या नाल्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातही सुमारे अडीच लाख क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध आहे. शिवाय या प्रकल्पामुळे परिसरातील सहा गावांतील विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील आदिवासीबहुल तामसवाडा शिवारातून वाहणाऱ्या या नाल्याला पावसाळ्यात पूर यायचा. त्यामुळे हजारो एकर शेती खरडून जात होती. पावसाळा संपल्यावर मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असे. मग काय, जनावरांसह येथील कुटुंबांना स्थलांतर करावे लागत होते. यंदा मात्र या शेतकरी, ग्रामस्थांवर ही वेळ येणार नाही. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्याने ही समस्या कायम निकाली निघाली आहे.
पावसाचे पाणी एकमेव स्रोत असल्यामुळे जलसंधारणाच्या या प्रयोगमध्ये मृत नाल्याचे पुनरुज्जीवन केल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. मे महिन्याच्या मध्यातही पाणीसाठा असल्यामुळे शेतकरी तिसरे उन्हाळी पीक घेत आहेत.
- माधव कोटस्थाने,
प्रकल्प अभियंता तथा सदस्य,
केंद्रीय बांधकाम पाणलोट व्यवस्थापन संचालन समिती, वर्धा.
च्उगम ते संगम या तत्त्वानुसार तामसवाडा येथील नाल्याचे ३५० मीटर लांबीपर्यंतचे २५ भाग करून प्रत्येक भागात पावसाचे पाणी अडवून साठविण्यात आले. शिरपूर पॅटर्ननुसार बांधलल्या या प्रकल्पामध्ये पाणी संथगतीने वाहणे, प्रत्येक भागात साठवणे सहजशक्य झाले आहे. यामुळे संगामाकडील भागात जलसाठा होतो व पुनर्भरण होते.
च्या उपक्रमामुळे मागील दोन पावसाळ्यांत ७० हजार क्युसेक मीटर पाणीसाठा झाला असून सुमारे पाच लक्ष क्युसेक मीटर पाणी भूगर्भात मुरले. त्यामुळेच सहा गावातील ४५ ते ५० विहिरीतील जलसाठ्यात सुमारे पाच मीटरपर्यंत वाढ झाली आहे.
२४ तास पाणी
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या सहा गावांना आता नाला पुनर्भरण प्रकल्पामुळे २४ तास पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला ४५ फूट पाणी उलपब्ध आहे.