पुन्हा मृत्यूचा ढीग!

By admin | Published: August 5, 2015 02:29 AM2015-08-05T02:29:10+5:302015-08-05T02:29:10+5:30

ठाकुर्लीतील इमारत दुर्घटना ताजी असतानाच, सोमवारी रात्री १.५५च्या सुमारास ठाण्यातील नौपाडा भागातील बी-कॅबिन परिसरातील ‘कृष्णा निवास’ ही तीन मजल्यांची इमारत कोसळली.

Death! | पुन्हा मृत्यूचा ढीग!

पुन्हा मृत्यूचा ढीग!

Next

ठाणे : ठाकुर्लीतील इमारत दुर्घटना ताजी असतानाच, सोमवारी रात्री १.५५च्या सुमारास ठाण्यातील नौपाडा भागातील बी-कॅबिन परिसरातील ‘कृष्णा निवास’ ही तीन मजल्यांची इमारत कोसळली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून, ७ जणांचे प्राण वाचविण्यात ठाणे आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला यश आले आहे. परंतु, या इमारत दुर्घटनेत सावंत आणि भट यांचे जवळजवळ संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. विशेष म्हणजे ५५ वर्षे जुनी असलेली ही इमारत ठाणे महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. या घटनेनंतर धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सोमवारी मध्यरात्री ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. परिसरातील संगम डोंगरे यांनी तत्काळ याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन, वीज महामंडळ, अग्निशमन यंत्रणा आणि पोलिसांना दिली. दरम्यान, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी घटनास्थळी धाव घेत इतर यंत्रणा येण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर काही मिनिटांत या तिन्ही यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. काही क्षणांत आपत्ती व्यवस्थापन विभागाने तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या ८०वर्षीय अरविंद नेणे यांची सुखरूप सुटका केली.
४.१०च्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला (एनडीआरएफ) घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी डॉग स्क्वॉड, लाइव्ह डिटेक्शन सिस्टीम, व्हिक्टीम लोकेशन आदी तंत्रज्ञानाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली कुठे, कोण अडकले आहे याची चाचपणी केली. ढिगारा उपसण्याचे काम सुरू झाले. अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच त्यांनी सहा जणांचे प्राण वाचविले. मात्र त्यानंतर एकेएक करीत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ठाणे येथील इमारत दुर्घटनेनंतर आता मोडकळीस आलेली इमारत सोडण्याची नोटीस बजावलेल्यांना ती सोडण्याची सक्ती करणारी दुरुस्ती भाडेनियंत्रण कायद्यात करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाणे व परिसरातील इमारत कोसळण्याच्या घटनांबाबत चर्चा झाली. इमारत नादुरुस्त झाल्यावर महापालिका ती रिकामी करण्याची नोटीस बजावते. परंतु अनेकदा पर्यायी व्यवस्था नसल्याने किंवा एवढ्या कमी भाड्यात दुसरीकडे निवासाची सोय होत नसल्याने रहिवासी घरे सोडत नाहीत.
ठाणे येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला नोटीस दिल्यावरही पाच-सहा कुटुंबे त्या इमारतीत वास्तव्य करीत होती. त्यामुळे भाडेनियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून नोटीस दिल्यावर ठरावीक मुदतीत इमारत रिकामी करावी लागेल व रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर सोपविली जाईल, असे महेता म्हणाले.
------छत कोसळून चार ठार
पारोळा (जि. जळगाव) : येथील मातीच्या घराचे छत कोसळून ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने पती-पत्नी व दोन मुले असे एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले. मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान राम मंदिर चौकात ही दुर्घटना घडली. भगवान भिकाजी मेथे (५५), त्यांची पत्नी लक्ष्मी (४५), दोन मुले हरीश (१३) व विजय (५) हे झोपेत असताना त्यांच्या घराचे छत कोसळले. मेथे यांच्या शेजारी राहणारे माजी नगरसेवक प्रकाश भोई यांची पत्नी पहाटे बाहेर आल्यानंतर त्यांना घराचे छत कोसळल्याचे दिसले.
------
मृतांमध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एका १४ आणि ७वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मृत : मीरा रामचंद्र भट (५८), त्यांचे पती रामचंद्र पांडुरंग भट (६५), त्यांचे भाऊ सुभराव पांडुरंग भट (५४), मुलगी रुचिता रामचंद्र भट (२२), रश्मी किरण मांगे (भट) (२५), अरुण दत्तात्रय सावंत (६२), भक्ती अजित खोत (सावंत - ३२), अनया अमित खोत (०७), अमित सावंत (४०), महादेव बर्वे (६०), मंदा अरविंद नेणे (७०) आणि प्रिया अमृतलाल पटेल (१४).
------
जखमींमध्ये ६ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
जखमी : अरविंद नेणे (८०), अमृतलाल पटेल (३५), आशा अमृतलाल पटेल (३०), रमेशचंद्र गालाजी मेढा (१८), मोहन नओजी (२०), शंकर भेडा (४०) आणि
अमित खोत (३४).

Web Title: Death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.