पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, 3 पोलिसांना जन्मठेप

By admin | Published: January 27, 2017 02:57 PM2017-01-27T14:57:35+5:302017-01-27T14:57:57+5:30

2014 साली कोल्हापुरातील पेठवडगाव पोलीस स्टेशनमधील कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Death of the accused in police custody, life imprisonment for 3 policemen | पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, 3 पोलिसांना जन्मठेप

पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, 3 पोलिसांना जन्मठेप

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 27 - संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या पेठवडगाव येथील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार (वय २१) याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे दोषारोपपत्रात सिद्ध झाले. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.   अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहायक फौजदार बबन दादू शिंदे, पोलीस नाईक धनाजी पाटील यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. २५ हजार रुपये दंडाची रक्कम ही मृत पोवारच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
 
गेल्या तीस वर्षापूर्वी शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये अरुण पांडव या आरोपीचा कोठडीमध्येच मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन पोलिसांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर पोलीस दलात शिक्षा सुनावण्यात आलेली ही दुसरी घटना. खटल्याची पार्श्वभूमी अशी, २३ ऑगस्ट २०१४ रोजी वडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दलित समाजाचे आंदोलन सुरु होते. दुपारी दीडच्या सुमारास के. एम. टी बसच्या काचा फोडून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी संशयित आरोपी सनी पोवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. 
 
सहायक फौजदार बबन शिंदे याने हातातील काठीने मारहाण करत शिवाजी हॉटेलपर्यंत नेले. त्यानंतर पोलीस जीपमधून त्याला पोलीस ठाण्यातील टीव्ही रुममध्ये ठेवले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावर शिंदे व पोलीस नाईक धनाजी पाटील हे मारहाण करुन चौकशी करीत असताना त्याच्या अचानक पोटात दुखू लागल्याने कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
 
त्याच्या पाठीवर, पायावर मारहणीचे वळ स्पष्ट दिसत असल्याने त्याच्या मृत्यूचे पडसाद वडगावसह कोल्हापुरात उमटले. संतप्त जमावाने वडगाव पोलीस ठाण्यावर दगडफेक करीत पोलीस ठाण्यासमोरील वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याचा थोरला भाऊ जयदीप पोवार याने वडगाव पोलिसांत दिली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, सहायक फौजदार बनन शिंदे, पोलीस नाईक धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा (३०२) दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सी. आय.डी) विभागाकडे देण्यात आला. आरोपींना अटक व्हावी, या मागणीसाठी १० सप्टेंबर रोजी बहुजन अन्याय निवारण कृती समितीच्या सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. 
 
त्यानंतर तत्काळ या तिघाही संशयितांना अटक झाली. राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मा. शा. पाटील यांनी तपास करुन महत्वाच्या साक्षी नोंदवल्या. सनी पोवारच्या मृतदेहाचे मिरज रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी मारहाणीत मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर तपास अधिकारी पाटील यांनी तिघा आरोपींच्या विरोधात सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्याकडे दोषारोपपत्र सादर केले.
 
त्यानंतर सत्र न्यायाधीश बिले यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले. यापैकी काहीजण फित्तूर झाले. खटल्याची सुनावणी न्यायालयात ऑक्टोबर २०१५ पासून सुरु झाली होती. आरोपीतर्फे ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर, एम. डी. सुर्वे, शिवाजीराव राणे, यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा पुराव ग्राह्य मानून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. 
 
अखेर न्याय मिळाला 
पोलीस मारहाणीत सनी पोवार याचा कोठडीत मृत्यू झाला. त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे केला. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने पोवार कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास फोनवरुन संपर्क साधून व्यक्त केली.  
 

Web Title: Death of the accused in police custody, life imprisonment for 3 policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.