विहिरीतील विषारी वायूने दोघांचा मृत्यू
By admin | Published: September 16, 2016 02:04 AM2016-09-16T02:04:21+5:302016-09-16T02:04:21+5:30
विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत कोचेवाही येथे गुरुवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान घडली.
गोंदिया : विहिरीतील विषारी वायू गळतीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत कोचेवाही येथे गुरुवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान घडली. मृतांची नावे मुनेश्वर बिसेन (३५) व संजय बिसेन (२५) अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुनेश्वर व संजय हे दोघे शेतात काम करीत असताना तहान लागल्याने मुनेश्वर विहिरीकडे गेला. विहिरीतून पाणी काढत असताना विहिरीतील विषारी वायूमुळे त्याचा जीव गुदमरून तो विहीरीत पडला. यावेळी मदतीसाठी त्याने काही अंतरावर असलेल्या संजयला आवाज दिला आणि नंतर तो बेशुद्ध पडला. संजय त्याला वाचविण्यासाठी धावला असता तोही विषारी वायुमुळे विहिरीत पडला आणि दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रावणवाडीचे ठाणेदार संजीव गावंडे घटनास्थळी पोहोचले. लोकमतला माहिती देताना त्यांनी सांगितले की, उपस्थित लोकांनी त्या विहिरीत जिवंत कोंबडी सोडली असता तिचा मृत्यू झाला. यावरून विहिरीत विषारी वायू असल्याची पुष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढायचे होते. त्यासाठी अग्निशमन विभागाला बोलाविण्यात आल्याची माहिती मिळाली. (शहर प्रतिनिधी)