विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू ; नऊ भाजले
By admin | Published: March 2, 2016 02:56 AM2016-03-02T02:56:17+5:302016-03-02T02:56:17+5:30
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, तर नऊ भाविक भाजल्याची अकोला तालुक्यातील घटना.
तेल्हारा (अकोला) : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, तर नऊ भाविक भाजल्याची घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगावबाजार येथे मंगळवारी दुपारी घडली. तिघांची प्रकृति गंभीर आहे. प्रकटदिनानिमित्त गजानन महाराज मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेदरम्यान हवा सुटल्याने मंडप उडाला. मंडपाच्या लोखंडी पाइपमध्ये विजेचा प्रवाह गेला. या पाइपला भाविकांना स्पर्श झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
तळेगावबाजार परिसरातील गोर्धा रोडवरील स्व. विनोद खरोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गजानन महाराजांचे मंदिर बांधण्यात आले आहे. १ मार्च रोजी प्रकटदिनानिमित्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास दरम्यान महाआरती चालू असताना जोरात हवा सुटली. त्यामुळे मंडप उडाला. मंडपावरून ११ केव्हीची तार गेली होती. मंडपाच्या लोखंडी पाइपमध्ये विद्युत प्रवाह गेला. पाइपला भाविकांचा स्पर्श झाल्याने भाविक भाजल्या गेले. अचानक घडलेल्या घटनेमुळे भाविकांची धावपळ झाली. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.
मंडप उडू नये, यासाठी प्रयत्न केल्याने घडली दुर्घटना
प्रकटदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शेतात मंडप टाकण्यात आला होता. जोरात हवा सुटल्याने मंडप उडून जात होता. मंडप उडू, नये यासाठी भाविकांनी मंडपाच्या पाइपला धरुन ठेवले; मात्र पाइपमध्ये विद्युत प्रवाह गेल्याने भाविक भाजल्या गेले.
उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यूने कवटाळले!
पाइपमध्ये विद्युत प्रवाह आल्याने राजीव गांधी विद्यालयाचे प्रा. सुनील ज्ञानदेव मानकर व अनंत साहेबराव खारोडे (६५) यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी तेल्हारा येथे हलविण्यात येत असताना मानकर यांची बेलखेडजवळ प्राणज्योत मालवली. तळेगावचे माजी मुख्याध्यापक अनंत साहेबराव खारोडे (६0) यांना उपचारार्थ अकोला येथे नेत असताना त्यांचाही मृत्यू झाला.
नऊ भाविक भाजले
सागर गोवर्धन बंड (२१), लक्ष्मण नामदेव दांडगे (६५), पुंडलीक वाकोडे यांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत मनोहर खारोडे, बाबूराव खारोडे, राजीव गांधी विद्यालयाचे प्राचार्य अरविंद गिर्हे, शुभम अशोक डिक्कर (२२), बंडू राऊत (५0), राजू प्रल्हाद खारोडे हे भाजले. त्यांना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.
मदतीसाठी धावले गावकरी
घटना घडताच जखमींना उपचाराकरिता डॉ. श्रीकांत शिंगोकार, प्रशांत मगर, उत्तम खारोडे, शिवा खारोडे, नंदू धुळे, किसना देशमुख, इतर सहकार्यांनी त्वरित ग्रामीण रुग्णालयात हलविले.