एसटी संपादरम्यान बसवाहकाचा मृत्यू, अकोले येथील घटना, रावतेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:41 AM2017-10-19T04:41:35+5:302017-10-19T04:41:59+5:30
ऐन दिवाळीतच सर्व एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. संपाच्या दुस-या दिवशी, बुधवारी अकोले आगाराच्या बसवाहकाचे हृदयविकाराने निधन झाले.
अकोले (जि. अहमदनगर) : ऐन दिवाळीतच सर्व एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. संपाच्या दुस-या दिवशी, बुधवारी अकोले आगाराच्या बसवाहकाचे हृदयविकाराने निधन झाले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्या भावाने केली आहे.
एकनाथ विठ्ठल वाकचौरे (५२) असे मृताचे नाव आहे. वाकचौरे बुधवारी सकाळपासून आंदोलनात बसून होते. दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बसस्थानकाजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परिवहन मंत्री रावते यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एकनाथ यांचे भाऊ वसंत वाकचौरे यांनी एका पत्राद्वारे केली. तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार नातेवाइकांनी केला. तणाव निवळल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
आमदार संजय कदमांवर गुन्हा
दापोली (जि. रत्नागिरी) : एसटी कर्मचाºयांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यासह काहीजणांवर दापोली पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संपावर तोडगा काढण्याऐवजी सरकार दडपशाही करत आहे. पुतळा दहन प्रकरणी पोलिसांनी सत्ताधाºयांच्या दबावाखाली गुन्हा नोंदवला आहे. जनहितासाठी असे शंभर गुन्हे अंगावर घेऊ, असे आ. संजय कदम म्हणाले.
पर्यायी खासगी बस अडवल्या : मुंबई : लक्ष्मीपूजनासाठी गावी जाणाºया भाविकांची खासगी वाहनचालकांनी मोठी लूट केली. बुधवारी सकाळी अॅप बेस टॅक्सी चालवणाºया कंपनीकडून परळ येथून मुंबई-पुणे मार्गासाठी दोन बस रवाना करण्यात आल्या. मात्र या बस वाशी आणि चेंबूर येथे अडवण्यात आली. परिणामी संबंधित मालकांनी आणखी बस न सोडण्याचा निर्णय घेतला.
एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनात वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू झाला आहे. हा सरकारच्या दडपशाहीमुळे झालेला मृत्यू आहे.
- राधाकृष्ण विखेपाटील, विरोधीपक्ष नेते, विधानसभा