जिवंत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
By Admin | Published: August 23, 2016 01:23 AM2016-08-23T01:23:17+5:302016-08-23T01:23:17+5:30
जिवंत असतानाही मृत असल्याचा दाखला काढल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे घडला
आंबेठाण : जिवंत असतानाही मृत असल्याचा दाखला काढल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे घडला आहे. सदर दाखला रोहिदास कुंडलिक जाधव या नावाच्या व्यक्तीचा असून, ‘लोकमत’च्या हाती तो लागला आहे. यातून अनेक गैरप्रकार व विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याची शक्यता आहे.
याबाबत जाधव यांना विचारले असता, आपणाला या प्रकाराबद्दल काही माहीत नाही. आम्ही स्वावलंबी असून तसा दाखला करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त असे की, पिंपरी बुद्रुक (ठाकूर पिंपरी) येथील जाधव या नावाची व्यक्ती सध्यादेखील याच गावात राहत आहे. परंतु या जिवंत व्यक्तीचा २०१३ सालीच मृत्यू झाला आहे, असा मृत्यूचा दाखला ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. जिवंत व्यक्तीच्या या मृत्यूच्या दाखल्यावर मृत्यू दिनांक ४ मार्च २०१३ असा लिहिण्यात आला आहे. याशिवाय हा मृत्यू पिंपरी बुद्रुक गावात झाला आहे, असाही उल्लेख आहे. नोंदणी क्रमांक हा ११९ असा टाकण्यात आला आहे. याशिवाय दाखल्यावर तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्याही शिक्क्यानिशी सह्या आहेत.
सरपंच विकास ठाकूर यांना विचारले असता, अशी मृत्यूची कुठलीही नोंद आमच्या ग्रामपंचायतीमधे नाही. या बोगस दाखल्याची चौकशी करून सत्य जगासमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या गैरप्रकारात तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक दोघेदेखील सामील असल्याचा भयानक प्रकार पुढे येत आहे. कोणाच्या सांगण्यावरून हा दाखला बनविला असेल किंवा असा दाखला बनविण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे, याचे गुलदस्त्यातील कारण शोधण्याचे दिव्य प्रशासनाला पार पाडावे लागेले. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आणि तेथील मृत्यूनोंदीचे रजिस्टर पाहिले असता त्यात २०१३ साली मयत झालेल्यांची आणि त्यांची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद पाहिली असता या वर्षी फक्त १७ लोक मयत झाले असल्याची नोंद आहे. याशिवाय या मयत १७ लोकांत बनावट दाखला दिला आहे त्यांच्या नावाची नोंददेखील नाही. २०१३ साली मयत १७ लोकांची नोंद आहे व या बनावट दाखल्यावर अनुक्रमांक ११९ लिहिण्यात आला आहे. यावरून हा बनावट प्रकार लक्षात येतो. (वार्ताहर)
>अशा प्रकारचे दाखले बनवून त्याच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे काय?, तसेच या गावाच्या परिसरात सध्या जमिनीला प्रचंड भाव आलेले आहेत. त्यामुळे जमीन उताऱ्यावर काही फेरफार केला आहे काय? अन्य कोणाचा असा दाखला बनविला आहे काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.