बिबट्याच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू
By admin | Published: August 23, 2016 05:53 AM2016-08-23T05:53:58+5:302016-08-23T05:53:58+5:30
आदिवासी वृद्धेचा बळी घेतल्यानंतर रविवारी सोनावळे डॅम परिसरात जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या बारकू भाऊ भोईर (५५) या गुराख्याचाही बळी घेतला.
ठाणे/शिरोशी : मुरबाड तालुक्यात हैदौस घालणाऱ्या बिबट्याने मीराबाई वारे या आदिवासी वृद्धेचा बळी घेतल्यानंतर रविवारी सोनावळे डॅम परिसरात जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या बारकू भाऊ भोईर (५५) या गुराख्याचाही बळी घेतला. यामुळे संतप्त आदिवासींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी काहींनी वनविभागाच्या वाहनांची मोडतोड केली, आतापर्यंत माळशेज घाट परिसर, फांगणे, झाडघरपठार, टोकावडे परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने हैदोस घालून कुत्री, बकऱ्या, गायी, म्हशी फस्त केल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या नरभक्षक बिबट्याचा वन खात्याने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी श्रमिक संघटनेने वन सचिवांकडे केली आहे.
या बिबट्याने गेल्या दोन महिन्यांपासून हैदोस घालूनही वन विभागाने हेतुपुरस्सर या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. बिबट्यास आठवडाभरात पकडले नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, असा
इशारा जनार्दन निचिते यांनी दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात श्रमिक मुक्ती संघटनेने वन सचिवांकडे तक्रार केली आहे. वन विभागाकडे शूटर नसून पोलिसांना बिबट्याला मारण्याचे अधिकार नसल्याकडे लक्ष वेधून आदिवासींचा जीव धोक्यात आल्याचे संघटनेच्या नेत्या अॅड. इंदवी तुळपुळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे. शासनाने ठोस पावले उचलली नाही, तर त्याचा बंदोबस्त आदिवासी स्वत:च करतील, याकडे त्यांनी वन सचिवांचे लक्ष वेधले आहे. (वार्ताहर)