आश्रमशाळेतील मुलीचा लातुरला तापाने मृत्यू
By admin | Published: February 13, 2017 03:27 AM2017-02-13T03:27:36+5:302017-02-13T03:27:36+5:30
दोन दिवसांपासून तापाने फणफणत असणारी बावची येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी रविवारी दगावली.
रेणापूर (जि. लातूर) : दोन दिवसांपासून तापाने फणफणत असणारी बावची येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी रविवारी दगावली. उपचाराकडे दुर्लक्ष झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
बावची येथे अनुसूचित जाती, नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा आहे. दोन दिवसांपासून दहावीतील विद्यार्थिनी बालिका विनायक चिकटे ही तापाने फणफणत होती. तिला उलट्याही होत होत्या. आजारपणाकडे आश्रमशाळेतील कर्मचारी व अधीक्षकांनी दुर्लक्ष करीत प्राथमिक उपचार म्हणून केवळ गोळ््या दिल्या, असे तिच्या काकू उषा चिकटे यांनी सांगितले. बालिका हिला मळमळ आणि उलट्या होत होत्या. तिच्यावर प्राथमिक उपचार केले. रात्री तिची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तिला पुन्हा आम्ही रेणापूरच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी लातूरला हलविण्यास सांगितले. डॉक्टरांनी तिला येथे मृत घोषित केले, असे मुख्याध्यापिका एस. एस. पांचाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)