डॉक्टरांच्या हलगर्जीने बालिकेचा मृत्यू
By admin | Published: January 7, 2017 01:26 AM2017-01-07T01:26:10+5:302017-01-07T01:26:10+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अरुंधती रमेश ढाके या नऊ महिन्यांच्या बालिकेला जीव गमवावा लागला.
पिंपरी : येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय प्रशासनाबाबत रुग्णांकडून अनेक तक्रारी पुढे येत असतानाच गुरुवारी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अरुंधती रमेश ढाके या नऊ महिन्यांच्या बालिकेला जीव गमवावा लागला.
रमेश ढाके हे भोसरीमध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी संध्याकाळी त्यांची मुलगी अरुंधतीची तब्येत खालावल्याने ढाके यांनी तिला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी आणले. निवासी डॉक्टर शिल्पा रावडे यांनी तिला तपासले व प्रकृती उत्तम असल्याचे सांगत तिला रुग्णालयात भरती करून घेण्यास टाळाटाळ केली. तसेच बाहेरुन औषधे विकत घेऊन त्यांना घरी जाण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर मात्र प्रकृती जास्तच खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
वायसीएममधील डॉक्टरांनी योग्य तपासणी न करता उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्यानेच मुलीचा जीव गेल्याचा आरोप रमेश ढाके यांनी केला आहे. संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
> संबंधित निवासी डॉक्टरला खुलासा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. उद्यापर्यंत मुदत दिली असून उत्तरानंतर रुग्णालय प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल.
- डॉ. मनोज देशमुख,
वैद्यकीय अधीक्षक