कीटकनाशकांमुळे मृत्यू :विषबाधाप्रकरणी एसआयटी स्थापन, वभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:43 AM2017-10-14T03:43:21+5:302017-10-14T03:43:32+5:30
यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या
मुंबई : यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. कृषी विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक, आरोग्य सहसंचालक, विभागीय कृषी संचालक सदस्य असतील. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक आणि फरिदाबाद येथील प्लान्ट प्रोटेक्शनचे प्रतिनिधी अशा सात जणांचा समावेश असणार आहे. याशिवाय तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित सदस्य म्हणून बोलाविण्याचा अधिकार एसआयटीच्या अध्यक्षांना देण्यात आला आहे.
शेतकºयांच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत जबाबदार घटक नक्की करणे, अशा प्रकारच्या आपत्तींवर प्रतिबंधासाठी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका, त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था निश्चित करणे, चिनी स्प्रेवरील बंदीबाबत शिफारस करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीला तीन आठवड्यांत आपला अहवाल सादर करायचा आहे.
यवतमाळ प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, पोलीस, वन अधिकारी, पशुशल्य चिकित्सक तसेच खासगी दवाखाने, गट विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी आदींनी वेळीच अहवाल सादर केला नसल्याचा ठपका, कृषी विभागाच्या गुरुवारी जारी जीआरमध्ये ठेवण्यात आला आहे.