युगचा मृत्यू गुदमरूनच

By Admin | Published: January 20, 2015 01:19 AM2015-01-20T01:19:42+5:302015-01-20T01:19:42+5:30

युग या छोट्या मुलाचा मृत्यू गुदमरून झाला होता, अशी साक्ष शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश वाघमोडे यांनी युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रधान जिल्हा

The death of the era does not stop | युगचा मृत्यू गुदमरूनच

युगचा मृत्यू गुदमरूनच

googlenewsNext

न्यायालय : अविनाश वाघमोडे यांची साक्ष
नागपूर : युग या छोट्या मुलाचा मृत्यू गुदमरून झाला होता, अशी साक्ष शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश वाघमोडे यांनी युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात दिली.
डॉ. वाघमोडे हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे न्याय वैद्यक शास्त्राचे सहाय्यक प्रोफेसर आहेत.
आपली सरतपासणी साक्ष देताना ते म्हणाले की, ३ सप्टेंबर २०१४ रोजी युग मुकेश चांडक या मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आला होता. दुपारी १२ ते १.४५ दरम्यान आपण उत्तरीय तपासणी केली. आपल्यासोबत डॉ. एच. के. खरतडे आणि डॉ. एम. एस. गेडाम होते.
मृताच्या अंगात निळ्या रंगाची हाफ जिन पँट, निळ्या रंगाची अंडरवियर, दोन मोजे आणि दोन काळ्या रंगाचे जोडे होते. जिन पँट आणि मोजे चिखलाने भरलेले होते. मृतदेह सडण्याच्या अवस्थेत होता.
मृताच्या अंगावर एकूण २६ जखमा होत्या. त्यापैकी चेहरा ते गळ्यावरील १ ते २१ क्रमांकाच्या जखमा आणि डोक्यावरील २६ क्रमांकाची जखम मृत्यूपूर्वीची आणि २२ ते २५ क्रमांकाच्या जखमा मृत्यूनंतरच्या होत्या.
शवविच्छेदनानंतर आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांनी युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा निष्कर्ष काढला होता. १ ते १३ क्रमांकाच्या जखमा त्याच्या मृत्यूस पुरेशा होत्या, असेही त्यांनी सांगितले.
राजेशने मृतदेह पुरल्याची जागा दाखवली
आरोपी राजेश दवारे याने युग चांडकच्या खुनाची आपल्या समक्ष कबुली देऊन मृतदेह पुरल्याची जागा दाखविली, अशी साक्ष पंच साक्षीदार डॉ. महेश फुलवानी यांनी दिली.
सरतपासणी साक्ष देताना ते म्हणाले की, २ सप्टेंबर रोजी आपण छापरूनगर येथे आपल्या आई-वडिलांना भेटण्यास जात असताना पोलीस ठाण्यासमोर गर्दी दिसली होती. आपण चौकशी करण्यासाठी थांबलो होतो. गर्दीतील काही मित्रांशी बोलत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी आपणास ठाण्यात बोलावले होते. त्यांनी आपणास घटना सांगितली. त्यांना पंच म्हणून काम करण्याची सहमती दिली.
पोलीस निरीक्षक जयस्वाल यांच्या कक्षात एका व्यक्तीला आणण्यात आले होते. त्याने स्वत:चे नाव राजेश दवारे, असे सांगितले होते.
डॉ. फुलवानी यांनी न्यायालयात हजर असलेल्या आरोपी राजेशला ओळखले. फुलवानी पुढे म्हणाले की, राजेशने आमच्या समक्ष युगचा खून केल्याची कबुली देऊन मृतदेह पुरलेली जागा दाखवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर मी स्वत: अन्य पंच मालपानी, आरोपी राजेश, पोलीस निरीक्षक जयस्वाल आणि अन्य पोलीस ताफा आम्ही निघालो.
आरोपीने पाटणसावंगी भागात नेले. डावीकडे वळण घेण्यास सांगून बाभूळखेड गावाकडे नेले. त्यानंतर त्याने एका पुलाजवळ पोलीस वाहन थांबवले. आम्ही सर्व वाहनातून उतरलो. राजेशने पुलाची जागा दाखवून पायवाटेने पुलाखाली नेले. नाल्यात पाणी नव्हते. राजेशने दाखवलेल्या ठिकाणी झाडांची पाने आणि वाळूने झाकलेला लहान मुलाचा मृतदेह होता. मृतदेहाच्या डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता आणि मृतदेहाच्या सभोवताल मोठ्या प्रमाणावर मुंग्या होत्या.
दगड ओळखला
डॉ. फुलवानी यांना न्यायालयात युगच्या डोक्यावर ठेवलेला दगड दाखविला असता त्यांनी तो निरखून ओळखला. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय , अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. जयश्री वासनिक यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the era does not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.