आर्थिक अडचणीमुळे स्वत:सह कुटुंबालाही संपविले एकाच कुटुंबातील पाच जणांवर अंत्यसंस्कार

By admin | Published: May 11, 2014 12:42 AM2014-05-11T00:42:20+5:302014-05-11T00:42:20+5:30

सुरत येथील आनंदा गायकवाड आणि त्याच्या परिवातील चार जणांवर आज भल्या पहाटे गोळेगाव येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Death to family with family due to financial difficulties, funeral for five family members | आर्थिक अडचणीमुळे स्वत:सह कुटुंबालाही संपविले एकाच कुटुंबातील पाच जणांवर अंत्यसंस्कार

आर्थिक अडचणीमुळे स्वत:सह कुटुंबालाही संपविले एकाच कुटुंबातील पाच जणांवर अंत्यसंस्कार

Next

 बोदवड (जि. जळगाव) : सुरत येथील आनंदा गायकवाड आणि त्याच्या परिवातील चार जणांवर आज भल्या पहाटे गोळेगाव येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे आनंदा याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील गोळेगाव येथील मूळ रहिवासी व सुरतला स्थायिक झालेल्या आनंदा गायकवाड याने पत्नी ज्योतीसह मुलगा नूतन व जयेश, मुलगी प्राजक्ता या चौघांची गळा दाबून हत्या केली. नंतर स्वत:ही गळफास घेतल्याची घटना सुरत येथे शुक्रवारी सकाळी घडली होती़ गोळेगाव येथील रावजी संपत गायकवाड (वय ७०) व सुपडाबाई रावजी गायकवाड (वय ६५) यांचा एकुलता एक मुलगा आनंदा याचा गावातीलच अर्जुन मतकर यांची मुलगी ज्योती हिच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता़ कामानिमित्त आनंदा हा आठ वर्षांपूर्वी सुरत येथे गेला होता. सुरतच्या पांडेसरा महादेवनगरात त्याचा रहिवास होता तर रघुकुल मार्केटमध्ये कापड व्यावसायिकाकडे तो अकाऊंटंट म्हणून कामास होता़ त्यांना मुलगा नूतन (वय १५), जयेश (वय ११) व मुलगी प्राजक्ता (वय ८) अशी तीन मुले. पती-पत्नीचा सुखी संसार सुरू असतानाच वाढत्या महागाईमुळे मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा रहाटगाडा ओढताना येणार्‍या अडचणींमुळे आनंदा काहीसा खचला होता़ त्यातच ११ मे २०१४ रोजी रावेर तालुक्यातील विवरे येथे भाचीचे लग्न होते. अन्नातून विष व नंतर गळा आवळला भविष्यातील विचाराने खचलेल्या आनंदाने मुलांना व पत्नीला जेवणातून विष देऊन बेशुद्ध केले व नंतर गळा आवळल्याचे सांगण्यात आले़ सर्वांचा मृत्यू झाला याची खातरजमा करीत त्याने स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली़ ही घटना सुरत येथे घडली होती. आवाज दिल्यानंतरही गायकवाड कुटुंबीयांकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेजार्‍यांनी लाकडी पार्टीेशनच्या घरात डोकावून पाहिले असता त्यांना विदारक दृश्य पाहावयास मिळाले. याबाबत सुरतमधील ते राहत असलेल्या पांडेसरा महादेवनगरमधील उधना झोन पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी गोळेगाव येथील कुटुंबीयांना माहिती कळवली़ मुलासह सून व नातवांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याचे ऐकताच वृद्ध माता-पित्यांनी हंबरडाच फोडला़ मयत ज्योती आनंदा गायकवाड यांचा लहान भाऊ अमृत अर्जुन मतकर व ग्रामस्थ़, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीण पाटील यांनी सुरत येथील आमदार सी.आर. पाटील यांच्या स्वीय सहायकाच्या मदतीने गोळेगाव येथे ११ मे रोजी सकाळी चार वाजता मृतदेह आणल्यानंतर भल्या पहाटे पाच वाजता गोळेगाव स्मशानभूमीत सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संपूर्ण गोळेगाव शोकमग्न झाले होते. बहिणीची भेट ठरली अखेरची मयत ज्योती ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती़ त्यांचा भाऊ अमृत मतकर हे आजारी असल्यामुळे भावाला पाहण्यासाठी त्या १५ दिवसांपूर्वीच माहेरी आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे बहिणीशी साधे बोलणेही न झाल्याची खंत भाऊ अमृतने बोलू दाखवली, शिवाय मेहुणे आनंदा यांना कुठलेही व्यसन नव्हते तर दोघांमध्ये कधी भांडणही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले़ केवळ आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हे असे कठीण पाऊल उचलले असल्याचा कयास त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)

Web Title: Death to family with family due to financial difficulties, funeral for five family members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.