माजी आमदार पांडुरंग ढोले यांचे अपघाती निधन
By Admin | Published: April 6, 2017 03:53 PM2017-04-06T15:53:37+5:302017-04-06T18:14:42+5:30
चांदूररेल्वे येथील माजी आमदार तथा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. पांडुरंग ढोले यांचे अपघाती निधन झाले आहे.
ऑनलाइन लोकत
अमरावती, दि. 6 : धामणगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग ढोले यांचे वाहन चालविताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पश्चात त्यांची चारचाकी रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावर आदळली. ही घटना गुरूवारी सकाळी ६ वाजता टेंभुर्णी गावानजीक घडली.
पांडुरंग ढोेले हे मुंबईतील जनता दल कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होऊन गुरूवारी पहाटेच विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहून चांदूररेल्वेला परतले होते. त्यानंतर स्वत:च्या कारने ते त्यांच्या कुऱ्हा येथील फार्म हाऊसकडे जाताना ही घटना घडली. हृदयविकाराने निधन झाल्यानंतर त्यांचे वाहन अपघातग्रस्त झाले. घटनेची माहिती त्यांचे सुपुत्र क्रांतीसागर ढोले यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पांडुरंग ढोलेंना अमरावती येथील रूग्णालयात आणताना वाटतेच त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग ढोले यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यासह जिल्ह्यात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. जनता दलाच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा क्रांतीसागर, दोन मुली नम्रता, सोनल चौधरी, जावई, नातवंडांसह मोठा आप्त परिवार आहे.
अशी गाजविली राजकीय कारकीर्द
पांडुरंग ढोले यांनी धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे सन १९९९ साली प्रतिनिधित्व केले. सन १९९४ पर्यंत ते काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश घेतला. त्यांनी चांदूररेल्वे बाजार समितीचे सभापतीपद, गृहनिर्माण संस्था आणि प्रभात शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षपदही सांभाळले. दलित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, ओेबीसी महासंघाचा लढवय्या नेता म्हणून त्यांनी जिल्ह्यात ओळख निर्माण केली होती. राज्य पर्यटन महामंडळाचे संचालकपदही त्यांनी भूषविले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ चांदूररेल्वेत निघालेल्या काँग्रेसच्या मोर्चाच्या वेळी पोलीस ठाण्यातील सब इन्सपेक्टर जळीत प्रकरणात ते प्रमुख आरोपी होेते. हा खटला राज्यभर गाजला होता, हे विशेष. मात्र, यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. विदर्भ एक्सप्रेसला चांदूररेल्वेत थांबा मिळवून देण्याचे सर्वस्वी श्रेय त्यांच्या पाठपुराव्याला व आंदोलनालाच आहे.