गणेश हत्तीचा मृत्यू ; आकडा पाचवर

By admin | Published: April 10, 2015 11:07 PM2015-04-10T23:07:31+5:302015-04-10T23:40:41+5:30

माणगाव आंबेरीतील दुर्दैवी घटना : अर्जुन, भीम हत्तींची काळजी घेणे आवश्यक

Death of Ganesh Elephant; The number five | गणेश हत्तीचा मृत्यू ; आकडा पाचवर

गणेश हत्तीचा मृत्यू ; आकडा पाचवर

Next

कुडाळ : माणगाव आंबेरी येथील क्रॉलमधील असलेल्या तीन हत्तींपैकी गणेश हत्तीचा अचानकपणे झालेला मृत्यू येथील सर्वांना चटका लावून गेला. आता तिथे असलेल्या भीम आणि अर्जुन या हत्तींच्या आरोग्याबाबत विशेष दक्षता वनविभागाला घेणे गरजेचे आहे. या दोन्ही हत्तींच्या आरोग्याची तपासणी येत्या चार दिवसात विशेष आरोग्य पथकाकडून होणे गरजेचे असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यत दुर्दैवी निधन पावलेला हा पाचवा हत्ती हत्ती आहे. माणगाव खोऱ्यात तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली १० वर्षे धुमाकूळ घालून अनेकांच्या जीवितास धोका ठरलेल्या तसेच करोडो रुपयांच्या वित्त हानीस कारणीभूत ठरलेल्या रानटी हत्तींना शासनाने विशेष हत्तीपकड मोहीम राबवून डॉ. उमाशंकर यांच्या नेतृत्वाखाली जेरबंद केले. त्यांना प्रशिक्षित कुणकी हत्ती बनविण्यासाठी माणगाव आंबेरी येथील क्रॉलमध्ये प्रशिक्षित माहुतांच्या हाताखाली प्रशिक्षण देण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे.
या दोन महिन्यांच्या कालावधीत आज मृत्यू पावलेला गणेश हत्ती हा योग्य प्रकारे प्रशिक्षित होत होता. तसेच तो तब्येतीनेही चांगला होता. असे असताना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याच्या अचानक त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमागचे कारण समजणे अत्यावश्यक आहे. गणेश हत्तीच्या या अचानक मृत्यू झाल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र प्रश्नार्थक राहतात.
या जिल्ह्यात याअगोदर २००९ साली हत्ती पकड मोहिमेत दोन हत्तींचे निधन झाले होते. त्यानंतर रांगणा तुळसुली येथे एक व डिगस-हिंदेवाडी येथे २०१३ साली एक हत्ती असे चार हत्तींचे निधन माणगाव खोऱ्यात झाले होते. येथे निधन पावलेला गणेश हा पाचवा हत्ती आहे. एकंदरीत हत्ती हा प्राणी शेड्यूल वनमध्ये गणला जात असून या हत्तीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे क्रॉलमध्ये दोन महिन्यांपासून असलेल्या या गणेश हत्तीचे निधन हे दुर्दैवी असून आता या क्रॉलमधील हत्तीची विशेष काळजी वनविभागाने घ्यावी. (प्रतिनिधी)

हत्तीच्या मृत्यूनंतरचे प्रश्न
राज्यातील पहिली हत्ती पकड मोहीम यशस्वी झाली. मोहिमेनंतर प्रशासनाचे येथे सेवासुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष झाले का? शेड्युल वनमध्ये असणाऱ्या या हत्ती प्राण्याबाबत सरकारने विशेष काळजी घेतली का? शेड्यूल वनमध्ये गणला जाणाऱ्या या हत्तींना येथे जेरबंद करण्यात आले. दोन महिन्यांपासून जेरबंद असणाऱ्या या हत्तींची गेल्या दोन महिन्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी झाली का? हा प्रश्न पडतो. एवढा मोठा खर्च करून ही हत्ती पकड मोहीम राबविली खरी. परंतु येथील हत्तींच्या देखभालीकरिता, त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात वन्य प्राण्यांचे तज्ज्ञ डॉक्टर आहे का? याचे उत्तर कदाचित नाही असेच येईल.



माहुतांचे शर्थीचे प्रयत्न
येथील माहुतांनी या हत्तींची काळजी घेण्याचे खूप प्रयत्न केले व अजूनही करताहेत. गणेश हत्तीच्या निधनाबाबत त्यांनाही खूप दु:ख झाल्याचे माहूत राघवेंद्र यांनी सांगितले. तसेच येथील दोन्हीही हत्ती गणेश हत्तींचे निधन झाल्याने तेही भावूक असून शांत असल्याचेही राघवेंद्र यांनी सांगितले. सकाळी १० वाजेपर्यंत चांगल्या स्थितीत उभा असलेला हत्ती काही कालावधीनंतर खाली बसतो आणि तिथेच प्राण सोडतो, याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.

हत्तींची तज्ज्ञांकडून तपासणी व्हावी
गणेशने केले होते हैराण
हत्ती पकड मोहिमेत पहिल्या दोन दिवसात भीम व अर्जुन हत्तींना डॉ. उमाशंकर व त्यांच्या पथकाने जेरबंद केले होते. मात्र, या टस्कर असलेल्या गणेश हत्तीने या पथकाला दोन दिवस हैराण केले होते. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हा हत्ती पथकाला जेरबंद करता आला.
भीम व अर्जुन झाले भावूक
सायंकाळी पोस्टमार्टेम व अंत्यविधीसाठी गणेश हत्तीला क्रॉलमधून बाहेर नेताना बाजूच्याच क्रॉलमध्ये असलेल्या भीम आणि अर्जुन या हत्तींना आपला भाऊ गेल्याची जाणीव झाली व त्यांनी या हत्तीला नेताना जोरजोरात चित्कार करून आपल्या गणेशप्रती आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातूनही अश्रू टपकले.


अचानक मृत्यू पावलेल्या हत्तीच्या निधनानंतर अन्य दोन हत्तींच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून येथील हत्तींची चांगल्या तज्ज्ञ व विशेष डॉक्टरकडून तपासणी येत्या चार दिवसात होणे गरजेचे असून सरकारने तत्काळ याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
येथील हत्तींची तपासणी करण्यासाठी डॉ. उमाशंकर यांना लवकरात लवकर बोलविण्याचा विचार असल्याचे उपवनसंरक्षक अधिकारी डॉ. रमेशकुमार यांनी दिली.

Web Title: Death of Ganesh Elephant; The number five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.