तरुणीचा मृत्यू दगड मारल्याने?

By admin | Published: February 16, 2015 03:38 AM2015-02-16T03:38:20+5:302015-02-16T03:38:20+5:30

अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून दर्शना पवार या तरुणीचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला

The death of the girl killed by stone? | तरुणीचा मृत्यू दगड मारल्याने?

तरुणीचा मृत्यू दगड मारल्याने?

Next

बदलापूर : अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून दर्शना पवार या तरुणीचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. मात्र या घटनेसंदर्भात पवार कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली आहे. धावत्या लोकलमध्ये दगड लागल्याने लोकलमधून खाली पडल्यानंतर तिच्या पर्समधील मोबाइल आणि पैसे काढून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तिचा अपघाती मृत्यू नसून चोरीच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करण्याच आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच खासगी रुग्णालयात नेण्यास पोलिसांनी विरोध केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दर्शना सोमवारी (९ फेब्रुवारी) ठाण्याहून ७.२० च्या बदलापूर लोकलने ती घरी येण्यासाठी निघाली होती. ज्यालोकलने ती प्रवास करत होती, ती लोकल अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान आल्यावर दर्शना पोल नं. ६२/७ जवळ पडली. मात्र, तिला दगड मारण्यात आल्याने ती लोकलमधून पडली, असा तिच्या नातेवाइकांचा आरोप आहे. लोकलमधून पडल्यावर १५ ते २० मिनिटांत स्टेशनमास्तर घटनास्थळी पोहोचले. जिथे ती पडली, त्या ठिकाणी तिची पर्स, चप्पल आणि मोबाइल आढळला नाही़ हे सर्व साहित्य अपघात झाला, त्या ठिकाणापासून दूर अस्ताव्यस्त पडले होते. त्यामुळे हा प्रकार चोरीच्या उद्देशाने केला असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी ती पडली, त्या ठिकाणी वारंवार दगड मारणे, काठी मारण्याच्या घटना घडत असतात, असे तिचा भाऊ सचिन पवार याचे म्हणणे आहे.
तिला एका समाजसेविकेच्या मदतीने अंबरनाथ पालिकेच्या छाया रु ग्णालयात नेण्यात आले. त्या महिलेने तिला खासगी रु गणालय नेऊ असे पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांनी ते ऐकले नाही़ त्यामुळे तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रु ग्णालयात हलविण्यात आले़ मध्यवर्ती रु ग्णालयाने मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात जाण्यास सांगितले़ जे. जे.मध्ये आयसीयू वॉर्डमध्ये जागा नसल्याने तिला मुंबईतील एका खासगी रु ग्णालयात नेले. मात्र, विलंब झाल्याने तिचा १० फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला.
दरम्यान, कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या शंकेनुसार पोलिसांनीही तपास सुरू केला असून अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the girl killed by stone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.