खाजगी वसतिगृहातील मुलीचा मृत्यू
By admin | Published: October 7, 2016 09:57 PM2016-10-07T21:57:14+5:302016-10-07T21:57:14+5:30
शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २१ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 07 - शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील एका २१ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. गेल्या चार दिवसांपासून रहस्यमयरित्या गायब झालेल्या ह्यत्याह्ण मुलीचा मृतदेह शहरातील एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ४ आॅक्टोबर रोजी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यातील शितल अंकुश शिंदे (२१, रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) ही लातुरातील एका खाजगी वसतिगृहात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याठी आली होती. दरम्यान, ४ आॅक्टोबर रोजी ती अचानक सकाळी ८.३० वाजता गायब झाली. याबाबत तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिस आणि नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. संबंधित वसतिगृहातील कर्मचचारी आणि मुलींकडेही चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिणामी, या प्रकरणात संशय वाढू लागला. कुटुंबियांनी आपल्या मुलीचा शोध लावावा, यासाठी पोलिसांकडे तगादा लावला. शुक्रवारी गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका जुन्या विहिरीत शितल शिंदे या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अभ्यासाच्या धास्तीने आत्महत्या?
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शितल ही लातुरात आलीी होती. ती सध्याला एका खाजगी वसतिगृहात राहत होती. अभ्यासाच्या धास्तीने तिने आत्महत्या केली असावी, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. तर मुलीच्या मृत्यूबाबत अधिक चौकशी केली असता, सध्याला संशयास्पद बाबी आढळून आल्या नाहीत. मात्र, या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करणार आहे. या संशयास्पद मृत्यूबाबत नातेवाईकांची सध्याला तक्रार नाही, असे गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोनि. गजानन भातलवंडे यांनी सांगितले.
शितल ही शेतकरी कुटुंबातील असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती लातुरात आली होती. ४ आॅक्टोबर रोजी सकाळपासूनच अचचानक गायब झाल्याने तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण तयार झाले आहे.