नातवाच्या आत्महत्येनंतर धक्याने आजीचाही मृत्यू
By admin | Published: August 18, 2016 08:50 PM2016-08-18T20:50:59+5:302016-08-18T21:00:27+5:30
केज तालुक्यातील कानडी बदन येथे एका युवकाने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 18 - केज तालुक्यातील कानडी बदन येथे एका युवकाने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर नातवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच त्याचे दु:ख सहन न झाल्याने इकडे घरी आजीचाही मृत्यू झाल्याची घटना आज घडली. एकाच दिवशी घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने सबंध गावावर शोककळा पसरली आहे.
अनिकेत रामकिसन नाईकवाडे (१८) असे मयताचे नाव आहे. अनिकेत हा दहावी नापास झाला होता. त्यानंतर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला व शेती व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. दिवसभर काम करून रात्री झोपण्यास तो शेतात जात होता. वडील रामकिसन नाईकवाडे व मोठ्या भावास हातभार लावू लागला.
दररोज सकाळी ८ च्या दरम्यान शेतातून घरी परतणारा अनिकेत आला नसल्याने वडील व भावाने शेताकडे धाव घेतली. ओढ्याजवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले. सर्व काही खेळीमेळीत सुरू असतानाच अचानकच अनिकेतने हे टोकाचे पाऊल उचलले. शवविच्छेदनानंतर दुपारी १२ वाजता त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण न समजल्याने नातेवाईकही अस्वस्थ झाले आहेत.
नातवाच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्याने आजी बायनाबाई रतन नाईकवाडे (वय ७५) यांचाही मृत्यू झाला. बयनाबाई यांचे वय झाल्याने त्या अनिकेतच्या अंत्यसंस्कारास आल्या नव्हत्या. मात्र, या घटनेनंतर त्या शांतच होत्या. अखेर त्यांनीही नातवाच्या विरहातच प्राण सोडले. सायंकाळी सहा वाजता बायनाबाई नाईकवाडे यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार झाले. एकाच दिवशी आजी- नातवाच्या मृत्यूमुळे कानडी बदनमध्ये शोककळा पसरली होती.
वडील रामकिसन रतन नाईकवाडे यांच्या खबरीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. जमादार बशीर शेख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
रक्षाबंधनावर दु:खाचे सावट
अनिकेतची मोठी बहीण बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. रक्षाबंधनाच्या सणानिमित्ताने सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. शेतातून भाऊ परतल्यानंतर राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित होता. भावाऐवजी त्याचे कलेवरच घरी आल्यावर तिच्यावर आकाश कोसळले. यातच त्यापाठोपाठ झालेल्या आजीच्या निधनाने सबंध गावावर शोककळा पसरली आहे.