सभागृह नेत्याच्या कारच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2016 02:46 AM2016-08-02T02:46:23+5:302016-08-02T02:46:23+5:30
महापालिकेच्या सभागृह नेत्याच्या कारच्या धडकेने पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना रविवारी रात्री सीबीडी येथे घडली आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या सभागृह नेत्याच्या कारच्या धडकेने पादचाऱ्याच्या मृत्यूची घटना रविवारी रात्री सीबीडी येथे घडली आहे. अपघातानंतर चालकाने कारसह घटनास्थळावरून पळ काढला होता. अखेर पोलिसांनी गाडीचा शोध घेवून चालकाला अटक केली आहे, तर अपघातावेळी आपण कारमध्ये नव्हतो, असे सभागृहनेते जयवंत सुतार यांनी पोलिसांना सांगितले आहे.
रविवारी गटारीच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सीबीडी सेक्टर १५ येथील रेतीबंदर ते सरोवर विहार रोडवर हा अपघात घडला. गॅरेजमध्ये काम करणारे हरी यादव (२४) व अदील मुकादम (२८) हे दोघे रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिली. अपघातानंतर जखमींना घटनास्थळीच सोडून कारचालक कारसह फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच गॅरेज मालकाने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी अदील याला मृत घोषित केले. मात्र गंभीर जखमी झालेल्या हरी यादव याने कारच्या पुढच्या नंबर प्लेटच्या ठिकाणी पदाची प्लेट होती अशी महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली होती. शिवाय घटनास्थळी वाहनावर लावण्यासाठी वापरला जाणारा महापालिकेचा झेंडा पोलिसांना आढळून आला. यामुळे ती कार पालिकेच्या पदाधिकाऱ्याची असणार यावर पोलीस ठाम होते. त्यानुसार उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. त्यांनी रात्रीपासून सकाळपर्यंत अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांकडे चौकशी करूनही त्या कारविषयी माहिती मिळू शकली नाही.
सोमवारी सकाळी अपघातग्रस्त कार नेरुळच्या होंडा शोरुममध्ये दुरुस्तीसाठी उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोडसे यांच्या पथकाने त्याठिकाणी जावून पाहणी केली. यावेळी सभागृहनेते जयवंत सुतार यांच्या वापरासाठी असलेली पालिकेची कार (एमएच ४३ जी ४५९) त्याठिकाणी आढळली.
कारची पुढची काच फुटलेली, बोनेटही दबलेला होता, शिवाय घटनास्थळी सापडलेला महापालिकेचा झेंडाही त्याच कारचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी कार ताब्यात घेवून सुतार यांच्याकडे चौकशी केली असता, अपघातावेळी आपण कारमध्ये नव्हतो असे सुतार यांनी पोलिसांना सांगितले. कारचालक विनायक (अभिजित) उंबरकर (३४) याच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. सीबीडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोमवारी सकाळी सुतार यांना घेण्यासाठी जावे लागणार असल्यामुळे रात्रीच कार घेवून नेरुळ येथील स्वत:च्या घरी जात होतो असे उंबरकरने सांगितले. (प्रतिनिधी)