अजिंठ्याच्या डोंगररांगात शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:21 AM2018-04-27T01:21:58+5:302018-04-27T01:21:58+5:30
सोयगाव वनक्षेत्रात घनदाट झाडी असल्याने या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे.
सोयगाव (जि. औरंगाबाद) : अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात शंभरावर पक्षी मरुन पडल्याचे गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आले.
सोयगाव वनक्षेत्रात घनदाट झाडी असल्याने या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही पाहुणे पक्षीही वास्तव्यास आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत वन विभाग या घटनेबाबत अनभिज्ञ होता. धीवर, चिमण्या, कावळे, बगळे, तुतारी, सुगरण, कबुतर आदी विविध मृत पक्ष्यांचा झाडाखाली सडाच आढळला. काही पक्षी घरट्यातच मृत झालेले दिसले. सोयगाव वनपरिक्षेत्रात असलेले दहा पाणवठे कोरडेठाक झाले आहेत. महिनाभरापासून या पाणवठ्यांमध्ये पाण्याचा थेंबही नाही. जंगलात पाणीच नसल्याने पाणी पिण्यासाठी वानरांच्या टोळ्यांनीही गावात धुमाकूळ सुरूकेला आहे. रोगाच्या विळख्यात सापडून किंवा उन्हाचा फटका बसल्याने पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी काळे यांनी सांगितले.
या घटनेबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, परंतु सोयगाव तालुक्यात पाणवठ्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी तुटपुंजा निधी मिळाला आहे. पक्षी मृत्यू प्रकरणाची माहिती घेऊन योग्य कारवाईच्या सूचना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात येतील.
-दिलीप वाघचौरे, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी सिल्लोड