टीचभर पोटासाठी मृत्यूच्या दाढेत
By admin | Published: May 16, 2016 01:29 AM2016-05-16T01:29:23+5:302016-05-16T01:29:23+5:30
फळविक्रते, खाद्यपदार्थ विक्रेते यांसह अनेक व्यावसायिक रोहित्र, डीपी, ट्रान्सफॉर्मरच्या खाली जवळपास व्यवसाय करताना दिसून येत आहेत
रहाटणी : सध्या शहरात अनेक ठिकाणी गटई कामगार, फळविक्रते, खाद्यपदार्थ विक्रेते यांसह अनेक व्यावसायिक रोहित्र, डीपी, ट्रान्सफॉर्मरच्या खाली जवळपास व्यवसाय करताना दिसून येत आहेत. एखादा अपघात होण्याच्या अगोदरच यांच्यावर आवर घालण्याची गरज आहे.
रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. तसेच कामाच्या शोधात आलेले ग्रामीण भागातील नागरिक मिळेल ते काम करणे, तसेच काम मिळालेच नाही, तर उदरनिर्वाह चालविण्यासाठी कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवत अनेकांनी फळेविक्री, भाजीपाला विक्री , खाद्यपदार्थ विक्री यांसह जमेल ते व्यवसाय करीत आहेत . पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भीतीपोटी काही व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसत आहेत. मात्र, आपण आपला जीव धोक्यात घालीत असल्याची कल्पना या व्यावसायिकांना लागत नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिक डीपी, उघडे रोहित्र, ट्रान्सफॉर्मर याच्या जवळ किंवा त्याखाली बसून व्यवसाय करीत आहेत. मात्र, हा प्रकार कधी तरी जिवावर बेतणारा आहे. चिंचवड येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बनसोडे हे अनेक वर्षांपासून येथे गटई काम करीत होते. बनसोडे हे अपंग होते. यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारची हालचाल करता आली नाही.
पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर डीपी आहे. त्याखाली मागील अनेक महिन्यांपासून गटई कामगार बसलेला असतो, तर त्याच्याच जवळ नारळ पाणी विक्रेता असतो. हे दोन्ही व्यावसायिक जीव धोक्यात घालून या ठिकाणी
व्यवसाय करीत आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे.(वार्ताहर)