आजारी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: July 26, 2016 01:02 AM2016-07-26T01:02:10+5:302016-07-26T01:02:10+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना; उपासमार व ट्रिपॅनोसोमा आजाराने मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली माहिती
किन्हीराजा/कवरदरी (जि. वाशिम): वाशिम जिल्ह्यातील चोहोबाजूंनी जंगलाने व्यापलेल्या कवरदरी या गावात सोमवार, २५ जुलै रोजी बिबट्या आढळला. आजारी असलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचार्यांना सलग दोन तास प्रयत्न करावे लागले. त्यानंतर अकोला येथे उपचारार्थ पाठवलेल्या बिबट्याचा सायंकाळी ४.३0च्या सुमारास मृत्यू झाला.
कवरदरी येथील काही ग्रामस्थांना आजारी बिबट गावानजीकची नदी ओलांडून येत असताना सोमवारी सकाळी ६.३0 वाजता आढळून आला. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनक्षेत्राच्या गस्तीवर असलेले वनरक्षक सी.डी. डहाके यांना दिली. तत्काळ वनाधिकार्यांचा चमूने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला गावात प्रवेश करण्यापासून रोखण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. यादरम्यान मोठय़ा शिताफीने जाळे टाकून बिबट्याला जेरबंद करण्यात आले. सकाळी ६.३0 वाजतापासून सुरू झालेला बिबट्याचा हा थरार ग्रामस्थांनी ८.३0 पर्यंंत अनुभवला.
दरम्यान, आजारी अवस्थेतील बिबट अकोला येथे उपचारार्थ आणले. मात्र अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना ते आजारी बिबट मरण पावले.
उपासमार व ट्रिपॅनोसोमा या घातक आजारांच्या विषाणूंची लागण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्यावर उपचार करीत असलेल्या डॉ. फरिन फानी यांनी ह्यलोकमतह्णला दिली. शवविच्छेदनानंतर तो बिबट्या गत आठ ते पंधरा दिवसांपासून उपाशी होता, अशी माहिती समोर आली. शवविच्छेदनानंतर कृषी विद्यापीठाच्या परिसरातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------
सोमवार, २५ जुलै रोजी सकाळी एक बिबट लोकवस्तीकडे येत असल्याचे कवरदरी शिवारातील नागरिकांनी पाहिले. आजारी असल्याने ग्लानी अवस्थेत भटकणार्या बिबटास जाळे टाकून पकडण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यास अकोल्यतील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाटी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र दुपारी ४.३0 च्या सुमारास ते मृत पावले.
- रामराव खोपडे
वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, मालेगाव