जोडमोहा वनक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: March 13, 2017 03:56 AM2017-03-13T03:56:12+5:302017-03-13T03:56:12+5:30
कळंब तालुक्यातील जोडमोहा वनक्षेत्रांतर्गत विठ्ठलवाडी शिवारात रविवारी दुपारी नर बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळला.
यवतमाळ : कळंब तालुक्यातील जोडमोहा वनक्षेत्रांतर्गत विठ्ठलवाडी शिवारात रविवारी दुपारी नर बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळला. आठवड्यात सलग दुसरा बिबट मृत झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये बिबटावर विष प्रयोगाचा संशय व्यक्त होत आहे.
वटबोरी जवळच्या विठ्ठलवाडी येथे साडेचार ते पाच वर्ष वयाचा नर बिबट मृतावस्थेत आढळला. त्याचे शरीर वरच्या भागाने कुजलेले होते. या बिबटाचे नख, दात, शेपटाचा गोंडा, मिशा शाबूत होत्या. या बिबटाचे पोटही भरलेले होते. त्याच्या एकंदरच आकारावरून हा बिबट चांगला धष्टपुष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या शरीरावर कुठेही जखमा नव्हत्या. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू हा विष प्रयोगातूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. बिबटाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा व्हिसेरा औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. तेथील अहवालावरूनच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र यवतमाळलगतच्या टाकळी शिवारातील घटनेनंतर चौथ्याच दिवशी जोडमोह परिक्षेत्रातील बिबट मृत्यू प्रकरण पुढे आले. यातून येथील वन्यजीव धोक्यात असल्याचे दिसून येते. या वन्यजीवांसाठी मानद वन्यजीव संरक्षक आणि वनविभागातील विविध यंत्रणेकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यांच्या एकंदरच कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह लावल्या जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)