डोलीत घालून तीन किमी पायपिट, तरीही वेळेत उपचार न मिळाल्याने माता-बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 07:03 AM2020-11-21T07:03:50+5:302020-11-21T07:04:17+5:30

आशा कार्यकर्ती मंगला वारे हिने १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासांंनंतर गावाच्या वेशीवर पोहोचली. 

Death of mother and child due to untimely treatment | डोलीत घालून तीन किमी पायपिट, तरीही वेळेत उपचार न मिळाल्याने माता-बालकाचा मृत्यू

डोलीत घालून तीन किमी पायपिट, तरीही वेळेत उपचार न मिळाल्याने माता-बालकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसरातील अतिदुर्गम आमले येथील मनीषा सन्या दोरे (२५) या गरोदर आदिवासी महिलेस प्रसूतीच्या वेदनाकाळात रुग्णवाहिका आणि उपचार वेळेत मिळाले नाहीत. या महिलेचे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात १७ नोव्हेंबरला सिझरिंग करण्यात आले. मात्र, त्याच रात्री बाळाचा मृत्यू झाला आणि महिला अत्यवस्थ झाली. या महिलेवर उपचार सुरू असताना तिचाही गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मृत्यू झाला.


अतिदुर्गम आमले येथील मनीषा सन्या दोरे (२५) या सात महिन्यांच्या गरोदर आदिवासी महिलेला अचानक रक्तस्राव आणि प्रसूतिवेदना मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास होऊ लागल्या. या वेळी येथील आशा कार्यकर्ती मंगला वारे हिने १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासांंनंतर गावाच्या वेशीवर पोहोचली. 


दरम्यानच्या काळात येथील ग्रामस्थांनी या महिलेस डोली करून तीन किलोमीटर पायपीट करत खोडाळा-वाडा या मुख्य रस्त्यावर आणले. या अडीच तासांत महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आणि पाणी बाहेर पडले.अशा अवस्थेतच तिची खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून पुढील उपचारासाठी तिला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच रात्री तिचे सिझरिंग करण्यात आले. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्याच रात्री त्या बाळाचा मृत्यू झाला आणि मनीषाही अत्यवस्थ झाली. तिच्यावर उपचार सुरू असतानाच मनीषाचा गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

या महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर ड्युटीवर असलेल्या डाॅक्टरांनी प्रथमोपचार केले. तिचा रक्तदाब कमी झाल्याने तसेच रक्तस्राव होत असल्याने तिला तातडीने नाशिकला हलविण्यात आले. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली १०८ रुग्णवाहिका कोविड सेंटरला दिली आहे. आम्ही १०८ ची अनेकदा मागणी केली आहे.
- डाॅ. सागर मुकणे,
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा

मनिषा दोरे ही महिला वेदनेने तळमळत होती. अशा अवस्थेत आम्ही डोली करून तीला मुख्य रस्त्यावर आणले. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासाने आली. या काळात तीच्या शरीरातुन खुप रक्तस्राव झाला आणि पाणी ही बाहेर पडले. तीला वेळेवर उपचार मिळाले असते तर माता आणि बाळ दोन्ही ही वाचले असते. अशा अनेक घटना आमच्या गावात घडल्या आहेत. याची दखल कोणी घेईल का  ?
- पांडुरंग लहु वारे, ग्रामस्थ आमले

Web Title: Death of mother and child due to untimely treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.