३२ आठवड्यांत जन्मलेल्या अर्भकाचा व्हेंटिलेटरअभावी नाशिकमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:57 PM2017-09-26T13:57:48+5:302017-09-26T14:11:31+5:30
व्हेंटिलेटरची गरज भासल्याने अखेर या शिशुला दुसºया रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. दरम्यान, या बाळाचा अखेर व्हेंटिलेटरअभावी श्वास थांबला!
नाशिक : येथील आदिवासी भागातील हरसूल ग्रामिण रुग्णालयात दाखल झालेल्या हेमलता कहांडोळ या महिलेची प्रसूती सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास झाली. ३२ आठवड्यांतच बाळ जन्माला आल्याने बाळाची अपुरी वाढ व पकृती चिंताजनक असल्याचे सांगून ग्रामिण रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात बाळ व मातेला कुटुंबियांनी दाखल केले. बाळाची प्रकृती खालावली असल्यामुळे शक्य ते उपचार येथील नवजात शिशु दक्षता विभागात करण्यात आले; मात्र व्हेंटिलेटरची गरज भासल्याने अखेर या शिशुला दुसºया रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. दरम्यान, या बाळाचा अखेर व्हेंटिलेटरअभावी श्वास थांबला!
मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या या नवजात शिशुच्या फुफ्फुसांमध्ये रक्तस्त्राव सुरू होता, असे निदान नाशिकमधील जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या नवजात शिशुअतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. ठाकूर यांनी केले आहे. जिल्हा रुग्णालयात सदर विभागामध्ये अर्भकांसाठी लागणारे व्हेंटिलेटर व ते हाताळणी करणारे वैद्यकिय टीम शासनाकडून उपलब्ध नसल्यामुळे या शिशुला जवळच्या आडगाव येथील पवार वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, असे ठाकूर म्हणाले; मात्र तत्पुर्वी सदर बाळाला दाखल करुन घेत त्याचा रक्तस्त्राव बंद करुन श्वासोच्छवास आॅक्सिजन देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र व्हेंटिलेटरशिवाय या बाळाला वाचविणे शक्य नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकिय महाविद्यालयात व्हेंटिलेटर नाही
चिंताजनक प्रकृतीमुळे व व्हेंटिलेटर अत्यावश्यक असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातून आडगावच्या वैद्यकिय महाविदयलयात बाळाला दाखल करण्यात आले; मात्र या ठिकाणीही बाळाला व्हेंटिलेटर नसल्यामुळे उपचारार्थ दाखल करुन घेण्यात आले नाही. त्यामुळे बाळाला कुटुंबियांनी पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचारासाठी दारोदार फिरण्याची ही तारेवरची कसरत मध्यरात्री एका आदिवासी कु टुंबियांची जीव वाचविण्याकरिता सुरू होती; मात्र सरकारी अनास्था आणि उदासिन प्रशासनाच्या कारभारामुळे तोकडी यंत्रणेअभावी अखेर जग बघण्यापुर्वीच शिशुने डोळे मिटले.
आॅगस्ट महिन्यात १८ ‘वॉर्मर’ची क्षमता असलेल्या विशेष नवजात शिशू दक्षता विभागात उपचारासाठी साडेतीनशे अर्भके दाखल झाली होती. त्यापैकी ५५ बालकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेने संपुर्ण राज्य हादरून गेले होते.
४२ शिशु उपचारार्थ दाखल
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ‘वॉर्मर’ची संख्या तोकडी असून अत्यवस्थ अवस्थेत दाखल होणाºया अर्भकांची प्रमाण मात्र ‘वॉर्मर’च्या दुप्पट आहे. १८ वॉर्मर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सध्या ४२ शिशु उपचारार्थ दाखल आहेत. एका वॉर्मरवर एक शिशुला ठेवून उपचार करावे, असे मार्गदर्शक तत्व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे आहे; मात्र वॉर्मरची संख्या कमी आणि बालके दगावण्याचा धोका अधिक असल्यामुळे एका वॉर्मरवर तीन ते चार शिशुंना ठेवून जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाला उपचार करावे लागत आहे.
नगरसेवकांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांचे दौरे झाले, पण फलित?
५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना राज्यभर गाजल्यानंतर नगरसेवकांपासून तर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची वारी केली. पाहणी केली, आश्वासनांची खैरात केली; मात्र फलित काय? असाच प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर या घटनेमुळे आला आहे. मागील महिन्यात झालेल्या या दौºयानंतरही जिल्हा रुग्णालयाचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने बालके दगावत आहेत.
‘टर्शरी केअर सेंटर’ला कधी मिळणार मान्यता?
नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय श्रेणी दोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे अडचण निर्माण होऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रुग्णालयाला ‘टर्शरी केअर सेंटर’ अद्याप उपलब्ध होत नाही. ही सरकारी त्रुटी कशी दूर होईल?
परिणामी आॅक्सिजनची गरज भासणाºया नवजात शिशुंना व्हेंटिलेटरसह तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविणे शक्य होत नाही. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशुंचा आॅक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने क बूल केले.