नऊ माकडांचा मृत्यू
By Admin | Published: February 9, 2015 05:41 AM2015-02-09T05:41:37+5:302015-02-09T05:41:37+5:30
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ माकडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार या माकडांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ माकडांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार या माकडांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसी तलावालगतच्या परिसरात शनिवारी १० माकडे मृतावस्थेत आढळल्याची माहिती रहिवाशांकडून रेस्किन्क असोसिएशन फॉर वाईल्ड लाइफ वेल्फेअरला मिळाली. त्या वेळी त्यांनी उद्यान प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाला दूरध्वनीहून माहिती दिली. दरम्यानच्या काळात दहा माकाडांपैकी दोन माकडे जखमी अवस्थेत असल्याचेही समजले.
शनिवारी सायंकाळी पाच ते सातच्या सुमारास उद्यान प्राधिकरणाच्या शोधपथकाने येथे तपास सुरू केला. परंतु या वेळी त्यांना काही आढळून आले नाही. रविवारी पुन्हा शोधकार्य हाती घल्यानंतर नऊ माकडांचे मृतदेह आढळले असून, त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मृत माकडांपैकी काहींच्या शरीरावर जखमा असून, काहींच्या शरीरावर निळ्या खुणा आहेत. महत्त्वाचे म्हणजे घटना घडलेल्या ठिकाणाच्या काही अंतरावर खाद्याची पाकिटे, प्लॅस्टिक बॅग आणि जळालेले हातमोजेही आढळून आले आहेत. परिणामी, हे साहित्य आढळलेल्या ठिकाणी माकडांना मारून त्यांचे मृतदेह दुसऱ्या ठिकाणी टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)