व्हेंटिलेटर न लावल्याने कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आराेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 06:17 AM2023-04-07T06:17:21+5:302023-04-07T06:17:38+5:30
राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८०० रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोनाबाधित महिला रुग्णाचे बुधवारी सायंकाळी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने निधन झाले, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संबंधित महिला खूप गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. त्यांचा रक्तदाब कमी होता, त्यामुळे व्हेंटिलेटर लावणे शक्य नव्हते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय बोदाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याने आरोग्य विभाग कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यात मागील आठवड्यात ६२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यामध्ये ग्रामीण भागात ३३, तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात २९ रुग्णांवर उपचार सुरू होते. मागील आठवड्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी ७ रुग्ण तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात ५ रुग्ण दररोज आढळून येत होते. तर या आठवड्यात ग्रामीण भागात १ तर वसई-विरार महापालिका क्षेत्रात ८ असे एकूण ९ रुग्ण दररोज आढळून येत आहेत.
बुधवारी दुपारी बोईसर शासकीय टीमा रुग्णालयात वाळवा गावातील एका ५५ वर्षीय महिलेला श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना पालघर रुग्णालयात हलविण्यात आले. तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू असताना त्यांचा त्रास वाढू लागला हाेता.
दिवसभरात कोरोनाचे ८०० रुग्ण
मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसते आहे. कोरोनाच्या विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे संसर्ग झपाट्याने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ दिसून येत आहे. राज्यात गुरुवारी ८०३ रुग्णांची नोंद झाली.