जोगेश्वरीत सरावानंतर एका गोविंदाचा मृत्यू
By admin | Published: August 11, 2014 03:35 AM2014-08-11T03:35:01+5:302014-08-11T03:35:01+5:30
सानपाड्यात एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीतील बेहराम नगरमधील ओम साई गोविंदा पथकातील ऋषिकेश पाटील (वय १९) या गोविंदाचा शनिवारी मध्यरात्री सरावानंतर अचानक मृत्यू झाला.
मुंबई : सानपाड्यात एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जोगेश्वरीतील बेहराम नगरमधील ओम साई गोविंदा पथकातील ऋषिकेश पाटील (वय १९) या गोविंदाचा शनिवारी मध्यरात्री सरावानंतर अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा गोविंदा मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे. दहीहंडीच्या सरावानंतर ऋषिकेशला चक्कर आल्याने विलेपार्ले येथील कूपर रूग्णालयात दाखल केले होते. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, वाकोला, सांताक्रूझ येथे सराव करताना आठ गोविंदा जखमी झाले आहेत. यात एका बारा वर्षाच्या गोविंदाचाही समावेश आहे.
गणेश नगरमध्ये राहणारा ऋषिकेश नेहमीप्रमाणे शनिवारीही गोविंदाचा सराव करण्यास हजर होता. सराव केल्यानंतर मित्रांसोबत तो रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत होता. दरम्यान रात्री साडेबारा वाजता चक्कर आल्याने ऋषिकेश जमिनीवर कोसळला. त्यावेळी मित्रांनी अधिक उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुभाष वेळे यांनी दिली.
शवविच्छेदनानंतर ऋषिकेशच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. तरी या घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास सुरू असल्याचे वेळे यांनी सांगितले.
वाकोला, सांताक्रूझ येथे दहीहंडीचा सराव करताना आठ गोविंदा जखमी झाले. आश्रय संस्थेद्वारे दहीहंडी पथकांसाठी सलामीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. बारा वर्षाखालील गोविंदांना सहभागी करू नये असा निर्णय झालेला असतानादेखील या सराव शिबिरात अनेक बालगोविंदा सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. थर रचत असताना तोल जाऊन गोविंदा खाली कोसळले. जखमी गोविंदांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे गोविंदा अंधेरीतील मालपा डोंगरी येथे राहणारे होते. (प्रतिनिधी)